दारूविक्रेत्यांची माहिती द्या व बक्षीस मिळवा

102

-मौशी ग्रामसभेचा निर्णय
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : कुरखेडा तालुक्यातील मौशी येथे सरपंच मिनाक्षी गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ग्रामसभेत अवैध दारूविक्रीबंदीचा निर्णय घेण्यात आला असून दारूविक्री करताना आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यावर तब्बल एक लाख रुपयांचा दंड आकारण्याचे ठरविण्यात आले. विशेष म्हणजे, दारूविक्रेत्यांचा मुद्देमाल पकडून देणाऱ्यासही 10 हजार रुपयांचा बक्षीस देण्यात येणार आहे. ग्रामसभेच्या या निर्णयामुळे दारूविक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मौशी येथे आयोजित ग्रामसभेत दारूबंदी व त्याचे दुष्परिणाम या विषयावर मुक्तिपथ तालुका प्रभारी शारदा मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर ग्रामवासी व महिला संघटन यांच्या पुढाकारातून गावामध्ये दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी गावामध्ये दारू मुक्त समिती नेमण्यात आली. त्याचप्रमाणे जो गावामध्ये किंवा गावाबाहेर दारू विक्री करेल त्याच्यावर एक लाख रुपये दंड, दारूबंदीला समर्थन करणाऱ्या व्यक्तीला किंवा महिलांना शिवीगाळ करून अपशब्द बोलेल किंवा सभेचा भंग करेल अशा व्यक्तीवर 50 हजार रुपये दंड तसेच दारूचा साठा पकडून देईल त्याला 10 हजार रुपये बक्षीस देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आहे. त्याचप्रमाणे शासकीय दाखले, कागदपत्रे बंद करण्यात येतील व ग्रामपंचायतद्वारे मिळणाऱ्या सर्व योजनांपासूनही दारूविक्रेत्यांना मुकावे लागणार आहे. दारूविक्रेत्यांविरोधात ग्रामसभेने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे निश्चितच गाव दारूविक्रीमुक्त होणार असल्याची आशा ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.
ग्रामसभेला ग्रामसेविका प्रज्ञाताई फुलझेले, ग्रा . पं.सदस्य अर्चनाताई कोडाप, माजी सरपंच उमाजी धुर्वे, पोलीस पाटील टीकाराम सहारे, वामन चांभारे, मिलिंद वट्टी, संदीप नैताम, किशोर कटिंग, मुकुंदा नैताम, जयराम मरसकोल्हे, दुर्योधन सहारे, कविता कोडाप, रेवता वट्टी, विजया कोडाप, हीरकन्या लाडे, विजया चांभारे, रेखा नैताम, बबीता हलामी, मंगला कुळमेथे, सत्यप्रभा सहारे, दमयंता सयाम, मोनिका नैताम, संगीता फटिंग, तुळजा वलके, पार्वता मडावी, सुप्रिया पुराम, यांच्यासह शक्तिपथ महिला, मुक्तीपथ तर्फे तालुका प्रभारी शारदा मेश्राम व तालुका प्रेरक जीवन दहीकर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here