२०२१ पासून दारूमुक्त गावाची मिळवली ओळख ; अतिदुर्गम भापडा गावाने उभारला विजयस्तंभ

135

The गडविश्व
गडचिरोली, २८ मार्च : एटापल्ली तालुक्यातील दुर्गम अशा भापडा गावात दोन वर्षापासून घरघुती दारू काढणे, विक्री पुर्णपणे बंद आहे. गावातील गाव संघटन सदस्य व ग्राम पंचायत समितीचे हे यश असून नुकतेच या गावाने विजयस्तंभ उभारून दारूमुक्त गावाची ओळख कायम ठेवली आहे.
एटापली तालुक्यातील सोहगाव ग्रामपंचायत अंतर्गत भापडा हे गाव तालुक्यापासून ६६ किमी अंतरावर वसलेले आहे. गावातील नागरिकांचा व्यवसाय मुख्यत: शेती व पुरक व्यवसाय म्हणून शेळी पालन, कोंबडी पालन, गाय पालन, मच्छी पालन केले जाते. त्यात कित्येक वर्षापासून चालत आलेल्या परंपरेनुसार गावात लग्न, पोलवा, पांडुम इत्यादी आदिवासी सणाला घरीच असलेल्या मोहफुलाची दारू काढून वापर करणे ही परंपरा कित्येक वर्षापासून चालत आलेली होती. मुक्तिपथ अभियानद्वारे गावात मुक्तिपथ गाव संघटन स्थापन करण्यात आली व अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी बैठकी होऊ लागल्या. गावात बैठकीमध्ये मुक्तिपथ गाव संघटन सदस्य, गाव पाटील, भुमय्या, बचतगट महिला, युवा संघटन सदस्य सर्वजण सहभागी झाले. गावात दारूविक्री, पिणे यावर चर्चा करून सन उत्सव, पोलो, पांडुम, नवाचे पोलो असतील तरीसुद्धा गावात घरघुती दारू काढायची नाही. गावात घरघुती दारू काढताना आढळला तर १० हजार रुपये दंड घेतला जाईल असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करीत ग्रामस्थांनी २०२१ पासून अवैध दारूविक्री बंद ठेवली आहे. आता भापडा गावात २ वर्षापासून घरघुती दारू काढणे व विकणे पुर्णपणे बंद आहे. गावातील गाव संघटन सदस्य व ग्राम पंचायत समितीचे यश आहे. नुकतेच गावात लोकवर्गणी करून विजयस्तंभ बोर्ड लावण्यात आले. याप्रसंगी गावातील मुक्तीपथ ग्राप समिती अध्यक्ष सरपंच जगूजी देहारी, उपसरपंच राधिकाताई पवार, मुक्तीपथ गाव संघटन सदस्य विकास सूरजबन्सी, अगेश देहारी, अक्षय देहारी, जगमत देहारी शिक्षक, विजय पवार,  अगमत पवार, मालती सूरजबन्सी, गंगोत्रीताई पवार, लीलनताई बघेल, मुक्तीपथ तालुका संघटक किशोर मलेवार व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

(The gadvishva) (The gdv) (muktipath) (gadchiroli)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here