– पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेतून सांगतली
गडविश्व
गडचिरोली, १८ ऑक्टोबर : जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव येथील रहिवासी शंकर पिरु कुंभारे यांचेसह त्यांचे परिवारातील चार व्यक्तींचा अवघ्या विस दिवसाचे कालावधीत अचानक आजारी पडुन मृत्यु झाल्याने त्या परिसरात भितीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या कुटुंबातील व्यक्तीचा एकामागोमाग मृत्यू कशामुळे झाला याबाबत शोध घेतला असता या रहस्यमयी मृत्यूचा उलगडा गडचिरोली पोलिसांनी केला असून कुटुंबातील व्यक्तीचा हात यामध्ये असल्याचे उघड झाले आहे. संघमित्रा कुंभारे व रोझा रामटेके असे या प्रकरणातील मुख्य आरोपींची नावे आहे.
२० सप्टेंबर २०२३ रोजी शंकर कुंभारे व त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना अहेरी व त्यानंतर चंद्रपूर व शेवटी नागपूर येथील नामांकित रुग्णालयात उपचाकरीता भरती करण्यात आले. परंतु २६ सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे व २७ सप्टेंबर रोजी त्यांच्या पत्नी सौ. विजया कुंभारे यांचा लागोपाठ दिवसात मृत्यु झाला. त्या धक्यातुन सावरत असतांना अचानक त्यांची गडअहेरी येथे राहणारी त्यांची मुलगी कोमल दहागावकर व मुलगा रोशन कुंभारे यांची तसेच शंकर कुंभारे यांची मुल येथे राहणारी साली आनंदा ऊर्फ वर्षा उराडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आले. अनेक औषध उपचार करुन देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न होता दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामध्ये ८ ऑक्टोबर रोजी कोमल दहागावकर, १४ ऑक्टोबर आनंदा ऊर्फ वर्षा उराडे व १५ ऑक्टोबर रोजी रोशन कुंभारे याचा मृत्यु झाला.
आई वडील उपचाराकरीता रुग्णालयात भरती असल्याची माहिती मिळताच शंकर कुंभारे यांचा दिल्ली येथे नोकरी निमित्य वास्तव्यास असलेला मोठा मुलगा सागर कुंभारे हा चंद्रपूर येथे आला असता, आई वडीलांच्या मृत्युनंतर तो दिल्ली येथे परत गेल्यावर अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास उपचाराकरिता दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. शंकर कुंभारे व विजया कुंभारे यांना अहेरी येथुन चंद्रपूर येथे उपचाराकरिता नेणारा त्यांच्या कारचा चालक राकेश मडावी याची देखील दुसऱ्या दिवशीपासुन प्रकृती बिघडल्याने त्याला देखील चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले. तसेच नातलग भरती असल्याने त्यांना मदतीच्या उद्देशाने शंकर कुंभारे यांच्या सालीचा मुलगा चंद्रपूर व नागपूर येथे आल्याने त्याची देखील प्रकृती बिघडल्याने त्याला उपचाराकरिता रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या तीनही व्यक्तींची प्रकृती स्थिर असुन प्रकृतीत सुधारणा होत असल्याबाबत वैद्यकिय अधिकारी यांनी कळविले आहे.
मृतक व आजारी व्यक्तींना एकसमान लक्षणे
मृत्यु पावलेल्या पाच व्यक्ती व सध्या उपचार घेत असलेल्या तीन व्यक्तींमध्ये हातापायाला मुंग्या येणे, कंबरेखालील भागामध्ये व डोक्यामध्ये प्रचंड वेदना व ओठ काळे पडुन जीभ जड पडणे यासारखे एकसमान लक्षणे दिसुन आली. सदर लक्षणावरुन मृत व आजारी व्यक्तींना कुठलीतरी विष बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकिय अधिकारी यांनी वर्तवीला परंतू त्यांच्या करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये ते विषाबाबत अधिक निश्चीत माहिती निष्पन्न झाली नाही.
एकाच परिवारातील पाच व्यक्तींच्या अल्पावधीत झालेल्या गुढ मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरुन भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर बाब पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी अत्यंत गांभिर्याने घेवुन अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी सुदर्शन राठोड, पोस्टे अहेरीचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांदे व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी व त्यांच्या तपास पथकास सदर गुन्हा उघडकिस आणण्याची जबाबदारी सोपविली.
प्रकरणाचा असा लावला छडा
तपास यंत्रणेने तात्काळ वेगवेगळे चार तपास पथक गठीत करुन त्यांची परिसरातील गोपणीय यंत्रणा सक्रिय करुन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्रात तसेच तेलंगणा राज्यात तपास करुन गुन्हा उघडकिस आणण्याचे प्रयत्न सुरु केले असतांना, परिसरातील गोपनीय सुत्रांकडुन गावात शंकर कुंभारे यांची सुन संघमित्रा कुंभारे व साल्याची पत्नी रोझा रामटेके यांचा गुन्ह्रात सक्रिय सहभाग असल्याचे माहिती मिळाली. त्यावरुन त्या दोघींच्याही हालचालींवर पोलीसांनी बारकाईने लक्ष ठेवुन त्यांना आज मंगळवार १८ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्या दोघींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान गुन्ह्याचा सखोल तपास केला असता महिला आरोपी संघमित्रा कुंभारे हिने रोशन कुंभारे याचेशी तिच्या आई वडीलांच्या विरोधात जावुन लग्न केले व या कारणामुळे तिच्या वडीलांनी आत्महत्या केली. तसेच याबाबत पती रोशन व सासरचे मंडळी तिच्या माहेरच्या लोकांच्या नावे वारंवार टोमणे मारत असत, तसेच सह आरोपी रोझा रामटेके हिने तिच्या सासऱ्यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीत शंकर कुंभारे यांची पत्नी विजया कुंभारे व तिच्या इतर बहिणी हिस्सा मागुन नेहमी वाद करित असल्याच्या कारणावरुन त्या दोघींनी संपुर्ण कुंभारे परिवार व त्यांचे नातलागांना विष देवुन जिवे ठार मारण्याची योजना आखली. त्या योजनेप्रमाणे रोझा रामटेके हिने तेलंगणा राज्यात जावुन विष आणले व ते विष जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या दोघींनी मृतकांच्या व आजारी व्यक्तींच्या खाण्यापिण्याच्या वस्तुंमध्ये मिसळुन त्यांना खाण्यास दिल्याने त्या विषाचा हळुहळु परिणाम होवुन त्या सर्व व्यक्ती एका पाठोपाठ आजारी पडण्यास सुरवात झाली व त्यात पाच व्यक्तींचा मृत्यु झाला. राकेश मडावी हा शंकर कुंभारे यांचे परिवारातील नव्हता परंतू तो त्यांच्या वाहनातील पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमधील पाणी पिल्याने विषबाधा होवुन तो आजारी पडला.
सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अहेरी येथे अप क्र. ३७४/२०२३ कलम ३०२, ३०७, ३२८, १२० (ब) व ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंद करुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी सुदर्शन राठोड हे करित असून सदर गुन्ह्यातील दोन्ही महिला आरोपी यांना आज मंगळवार १८ ऑक्टोबर २०२३ चे ०९: ५२ वा. अटक करण्यात आली. तसेच सदर गुन्ह्रात इतर आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. सदर गुन्हा उघडकिस आणण्याकरीता पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अहेरी व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
(The GDV, The Gadvishva, Gadchiroli News Updates, Aheri Mahagao, Kumbhare, Sp Gadchiroli, SP Nilotpal, Gadchrioli Crime News)