– ३० हजारांचा दंड; न भरल्यास ६ महिने वाढीव शिक्षा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : नाकाबंदीच्या कर्तव्यात असलेल्या पोलीस अंमलदाराला भरधाव कारने चिरडून ठार केल्याप्रकरणी आरोपी मोरेश्वर वामन हेडाऊ (वय ३५, रा. गोकुळनगर, गडचिरोली) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने २ वर्षे सश्रम कारावास आणि ३०,००० रुपयांच्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असा आदेश मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक आर. जोशी यांनी दिला.
लोकसभा निवडणूक २०१९ दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी लावण्यात आली होती. १७ मार्च २०१९ रोजी पहाटे १ वाजताच्या सुमारास आरमोरी-गडचिरोली मार्गावरील सोनु ढाबा नजीक नाकाबंदी सुरू असताना, पोलीस नाईक केवळराम येलोरे हे वाहनांची तपासणी करत होते. त्याचवेळी आरमोरीकडून भरधाव वेगात येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर (MH-33/0888) चारचाकी वाहनाला पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला. मात्र वाहन न थांबवता चालकाने थेट येलोरे यांना जोरात धडक दिली.
या अपघातात येलोरे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर आरोपी वाहनचालक मोरेश्वर हेडाऊ यास घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४(अ), ३५३, ३३३ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर सत्र खटला क्रमांक २०/२०२० अंतर्गत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीत सरकारी पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील निळकंठ भांडेकर यांनी युक्तिवाद केला. तपास अधिकारी म्हणून सपोनि चेतनसिंग चव्हाण यांनी तपास पूर्ण केला. तसेच कोर्ट पॅरवीसाठी पोनि चंद्रकांत वावळे, पोउपनि शंकर चौधरी, सफौ सागर मुल्लेवार, महिला पोलीस जिजा कुसनाके, मिनाक्षी पोरेड्डीवार व छाया शेट्टीवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
न्यायालयाने उपलब्ध साक्षी, पंचनामे, वैद्यकीय अहवाल व युक्तिवाद लक्षात घेऊन आरोपीस दोषी ठरवले व शिक्षा सुनावली. हा निर्णय कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेला न्याय देणारा असून, रस्त्यावरील बेदरकार वागणुकीविरोधात कठोर संदेश देणारा ठरला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #crimenews #गडचिरोली #नाकाबंदी #पोलीसअपघात #न्यायालयनिर्णय #सश्रमकारावास #गुन्हेवार्ता #मृत्यूप्रकरण #पोलीसआक्रमण #वाहनचालकशिक्षा #मोटारवाहनकायदा
#Gadchiroli #PoliceDuty #AccidentCase #CourtVerdict #Imprisonment #HitAndRun #PoliceKilled #SwiftDzire #Judgement #CrimeNews
