गडचिरोली : कोंबड्यांच्या झुंजीवर पोलिसांची धाड,44 लाखांचा मुद्देमाल जप्त
– तब्बल ९२ जुगारी अटकेत
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुपचूप भरविण्यात येणाऱ्या अवैध कोंबडाबाजारावर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रेगडी पोलीस ठाणे हद्दीतील गरंजी टोला येथे रविवार 21 सप्टेंबर रोजी कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळत असलेल्या तब्बल 92 जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 46 मोटारसायकली, पाच चारचाकी वाहने, 31 मोबाईल फोन, 14 कोंबडे, पाच लोखंडी काती तसेच 42 हजार 950 रुपये रोख रक्कम असा मिळून एकूण 44 लाख 26 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
सदर कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक धानोरा अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकाने टाकली. माओवादीविरोधी मोहिमेदरम्यान गरंजी टोला जंगल परिसरातून आरडाओरड ऐकू आल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता कोंबड्यांची झुंज लावून त्यावर जुगार खेळला जात असल्याचे दिसून आले. वरिष्ठांच्या आदेशानंतर पंचांच्या उपस्थितीत धाड टाकण्यात आली. पोलिसांच्या येण्याची चाहूल लागताच काही जुगारी पळ काढण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून सर्व 92 जणांना पकडले.
या प्रकरणी रेगडी पोलीस ठाण्यात गु.र. क्र. 26/2025 नोंदवून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12(ब) तसेच प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध अधिनियम, 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उ.नि. कुणाल इंगळे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, सपोनि. विश्वास बागल, पो.उ.नि. ज्ञानेश्वर धुमाळ, पो.उ.नि. देवाजी कोवासे व विशेष पथकातील अंमलदारांचा सक्रिय सहभाग होता.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #breakingnews #GadchiroliPolice #IllegalGambling #CockfightRaid #PoliceAction #CrimeNews #MaharashtraNews #LawEnforcement #GadchiroliNews #AntiGamblingDrive #SeizedProperty














