The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : जागतिक रक्तदाता दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलामार्फत ‘प्रोजेक्ट उडान’ उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली आणि उप-जिल्हा रुग्णालय, अहेरी यांच्या सहकार्याने गडचिरोली पोलीस मुख्यालय, उप-मुख्यालय प्राणहिता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिरोंचा येथे एकाच दिवशी तीन ठिकाणी ही शिबिरे पार पडली. विशेष म्हणजे, या शिबिरात पहिल्यांदाच आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवत समाजप्रती सकारात्मक पावले उचलली.
या शिबिरांमध्ये एकूण 330 रक्तदात्यांनी रक्तदान करून “रक्तदान हेच श्रेष्ठदान” या भावनेला कृतीत उतरवले. यामध्ये गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफचे अधिकारी व अंमलदार, विविध शासकीय कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि आत्मसमर्पित माओवादी यांचा समावेश होता. गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की, मागील वर्षभरात गडचिरोली पोलीस दलाने विविध रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून सुमारे 2800 युनिट रक्त संकलित केले असून, प्रत्येकाने दर तीन महिन्यांनी रक्तदान करण्याचा संकल्प केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रत्येक ठिकाणी झालेल्या शिबिरांचे उद्घाटन स्थानिक पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. अहेरीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, डॉ. सचिन धोटे, पोनि हर्षल एकरे तर सिरोंचामध्ये संदेश नाईक, डॉ. चेतना वरठी, डॉ. करिष्मा नान्ने, डॉ. आदित्य सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस कल्याण शाखा, जनसंपर्क शाखा, नागरी कृती शाखा तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची पूर्ण टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हा उपक्रम केवळ रक्तदानापुरता मर्यादित न राहता, आत्मसमर्पित माओवाद्यांच्या सहभागातून परिवर्तनाचा सकारात्मक संदेश देणारा ठरला. गडचिरोली पोलीस दलाचे हे पाऊल सामाजिक सलोखा व मानवतेच्या दिशेने महत्त्वाचे ठरले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolice #gadchirolinews #blooddonationcamp)