गडचिरोली : लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला, तारखा जाहीर, आचारसंहिता लागू

1336

चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्रात १६१३०९६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : नवी दिल्ली येथील विज्ञान भवन मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च २०२४ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ चा कार्यक्रम घोषित केला आहे. ७ टप्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असून महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. या अनुषंगाने १२-गडचिरोली-चिमूर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक कार्यक्रमाची रुपरेषा व निवडणूक प्रक्रिये विषयी माहिती देण्यासाठी आज १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे  पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी १२-गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्यात निवडणूका पार पडणार आहेत. त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आह याबाबत विस्तृत माहिती दिली.

२० मार्च २०२४ – अधिसूचना जाहीर करणे
२७ मार्च २०२४ – नामनिर्देशन पत्र दाखल करणे अंतिम तारीख
२८ मार्च २०२४ – नामनिर्देशन पत्राची छानणी
३० मार्च २०२४ – उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तिथी
१९ एप्रिल २०२४ – मतदानाचा दिनांक
०४ जुन २०२४ – मतमोजणीचा दिनांक

दरम्यान निवडणूक घोषित झाल्याच्या क्षणापासून संपूर्ण मतदार संघात आचार संहिता लागू झालेली आहे. भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे आचार संहितेचे तंतोतंत पालन सर्वांनी करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.
१२-गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. यापैकी ३ विधानसभा मतदार संघ गडचिरोली जिल्ह्यात, २ विधानसभा मतदार संघ चंद्रपूर जिल्ह्यात तर १ विधानसभा मतदार संघ गोंदिया जिल्ह्यात येतो. एकुण १८८६ मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. त्यापैकी गडचिरोली जिल्ह्यात ९४८ मतदान केंद्रे असून त्यापैकी १५० शहरी भागात तर ७९८ मतदान केंद्रे ग्रामीण भागात आहेत. २३ जानेवारी २०२४ रोजी प्रसिध्द मतदार यादीनुसार गडचिरोली जिल्ह्यात एकुण ८०४१५२ मतदार आहेत. तर संपूर्ण लोकसभा मतदार संघात १६१३०९६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सेनादलातील मतदार ५१९ व ४८४४ मतदार दिव्यांग आहेत.
१२-गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघामध्ये ६६- आमगांव, ६७ आरमोरी, ६८- गडचिरोली, ६९- अहेरी, ७३-ब्रम्हपुरी, ७४-चिमुर या सहा मतदार संघाचा समावेश असुन, सदर लोकसभा मतदार संघामध्ये ८,१२,२०५ पुरुष मतदार व ७,९९,४०९ स्त्रि मतदार व १२ तृतियपंथी तसेच सेनादलातील १४७० असे एकुण १६,१३,०९६ मतदारांचा समावेश आहे. तसेच सदर लोकसभा मतदार संघामध्ये १८८६ मतदान केंद्रांचा समावेश आहे.

मतदार संघनिहाय मतदारांचा तपशिल

भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च २०२४ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने निवडणूक विषयक आदर्श आचारसंहिता लागु करण्यात आलेली आहे. तेव्हा १२- गडचिरोली चिमुर लोकसभा मतदार संघामध्ये समाविष्ठ सर्व नागरीकांनी, राजकिय पक्षांनी, शासकिय निमशासकिय संस्थांनी तसेच सर्व कार्यालय प्रमुखांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. निवडणूक उमेदवारांना तसेच राजकीय पक्षांना ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याकरिता परवानगी देण्यात येणार आहे. या ध्वनीक्षेपकाचा वापर हा सकाळी ६-०० रात्री १०-०० वाजेपर्यंत करायचा आहे. यासंबंधाने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन होईल याची खबरदारी घ्यावी. EPIC कार्ड असणे म्हणजे मतदाराला मतदानाने अधिकार नसून त्याकरिता मतदार यादीत त्या मतदाराचं नांव असणे आवश्यक आहे. मतदाराकरिता आलेल्या मतदाराचे नांव मतदार यादीत असल्यास भारत निवडणूक आयोग यांनी ठरवून दिलेल्या ११ पैकी कोणताही दस्ताऐवज ओळखपत्र सादर केल्यास त्याला मतदान करता येईल. नविन मतदार नोंदणी करीता नमुना क्र. ६ भरायचा असुन त्याची अंतिम मुदत २७ मार्च २०२४ असुन नावात बदल करणे स्थानांतरण करणे याची कार्यवाही संपुष्टात आली आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी ६-०० वाजता मॉक पोल घेण्यात येईल याकरिता उमेदवारांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे. उमेदवारांच्या प्रतिनिधींना ओळखपत्रे देण्यात येईल ते त्यांनी सोबत ठेवावे. हे मॉक पोल फक्त ५० मतदान करुन करता येईल. लोकसभा निवडणूकीत VVPAT चा वापर करण्यात येत असुन मतदारांमध्ये जागरुकता व्हावी याकरिता अधिकारी/कर्मचारी तसेच जनतेमध्ये जागृती करण्याकरिता प्रशिक्षण देण्यात आले असुन याबाबत गडचिरोली जिल्ह्यामधील ९४८ मतदान केंद्रामधील व्यक्तींना प्रात्यक्षीक दाखविण्यात आलेले आहे.

मतदान केंद्रांवर दिव्यांग, गर्भवती स्त्रिया, वयोवृद्ध मतदारांकरिता विशेष व्यवस्था –

मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदाराकरिता वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच गर्भवती स्त्रिया, वयोवृध्द मतदारांकरिता सुध्दा विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. यांना सामान्य मतदारांच्या रांगे मध्ये उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यांना मतदानाकरिता प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तसेच त्यांना मदतनीस देण्यात येईल.

निवडणूक संदर्भाने आवश्यक सर्व परवानगी मिळण्याकरीता जिल्हा कार्यालय गडचिरोली येथे एक खिडकी योजनेअंतर्गत शाखेची स्थापना करण्यात आली आहे. पेड न्युजसाठी स्वतंत्र नियंत्रण समिती नेमून त्यावर नियंत्रण ठेवणेत येणार आहे.
निवडणूक उमेदवारांनी त्यांचे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम तसेच व्हाट्स अप क्रमांक सादर करावे यावर लक्ष राहणार आहे. सोशल मिडिआ मध्ये आक्षेपार्ह मजकुर असल्यास त्यावर कारवाही करण्यात येईल. गडचिरोली जिल्हा हा दारू मुक्त असल्याने दारुबंदीचे उल्लंघन होणार नाही, सर्वांनी दक्षता घ्यावी.
राजकीय जाहिरातीच्या प्रसारण पूर्व प्रमाणीकरण करण्यासाठी राजकीय पक्ष माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कडे संपर्क करावा. त्याअनुषंगाने आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. पेड न्युज प्रसिध्द करता कामा नये.
वरील माहिती व्यतिरिक्त निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्देशांचे पालन करुन निवडणूका स्वच्छ व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.

(#thegdv #thegadvishva #loksabhaelection2024 #gadchirolinews)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here