– जिल्ह्यात पावसाने लावली हजेरी
The गडविश्व
गडचिरोली, १८ मार्च : जिल्ह्यात आज १८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. दरम्यान चामोर्शी तालुक्यातील मालेरचक मंडळ कुनघाडा येथील विद्यार्थिनी शाळेतून परतत असतांना अंगावर वीज कोसळल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कु, स्वीटी बंडू सोमनकर (१६) असे मृतक विद्यार्थिनेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी तालुक्यातील तलाठी साजा क्रमांक १ नवेगाव रै मधील अंतर्भूत मालेरचक मंडळ कुनघाडा येथील कु. स्वीटी बंडू सोमनकर ही इयत्ता नवव्या वर्गात शिक्षण घेत होती. आज सकाळच्या सुमारास तालुक्यात विजांच्या कडकडातेसह पावसाने हजेरी लावली. दरम्यान स्वीटी ही शाळेतून परतत असतांना तिच्यावर वीज कोसळली यात ती गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा मृत्यू झाला.
सदर घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून शोक व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्याला दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तर्फे करण्यात आले आहे.

(The gadvishva) (The gdv) (Gadchiroli kunghada malher chamorshi) (Gadchiroli: Death of student due to lightning strike)