– ग्रामस्थांचा वनविभागाविरोधात संताप, शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रातील पोर्ला हद्दीत आज सकाळी घडलेल्या भीषण घटनेत चुरचुरा येथील वामन मारुती गेडाम या गुराख्याचा रानटी हत्तीच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. गुरे चारण्यासाठी गेलेल्या या इसमावर अचानक हत्तीने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाला. घटनेनंतर परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमिर्झा, चुरचुरा, दिभना परिसरात रानटी हत्तींचा कळप सतत वावरत आहे. या कळपामुळे शेतजमिनींचे नुकसान, घरांचे विध्वंस आणि जीवितहानीचे प्रकार वारंवार घडत असूनही वनविभागाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, अशी ग्रामस्थांची तीव्र नाराजी आहे. आजची घटना ही वनविभागाच्या दुर्लक्षामुळे घडल्याचा आरोप ग्रामस्थ करत असून, तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ओडिशा राज्यातून रानटी हत्तींचे कळप गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला असून त्यांचा वावर हा आता गंभीर समस्या बनला आहे. शेतजमिनींचे प्रचंड नुकसान, पिकांचे हानी आणि नागरिकांच्या जीवितावर सततचा धोका यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. तरीदेखील वनविभागाकडून केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस यंत्रणा उभी राहिलेली नाही.
गुराख्याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शासनाने मृताच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, वनविभागाने हत्तींच्या हालचालींवर नियंत्रणासाठी विशेष पथके नेमावीत आणि कायमस्वरूपी उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक नागरिकांचा आक्रोश ऐकूनही जर शासन व वनविभागाने वेळेत हस्तक्षेप केला नाही, तर मोठे लोकआंदोलन उभे राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #WildElephant #ElephantAttack #Shepherd #ForestDepartment #Villagers #Government #Protest #OdishaElephants #ForestConflict #गडचिरोली #रानटीहत्ती #हत्तीहल्ला #गुराखा #वनविभाग #ग्रामस्थ #शासन #आंदोलन #ओडिशाहत्ती #जंगल














