– इंदिरा गांधी चौक परिसर केले स्वच्छ
The गडविश्व
गडचिरोली, ४ सप्टेंबर : लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त “माझे ठिकाण माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत”गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक व परिसरात आज ४ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी इंदिरा गांधी चौकातील आरमोरी रोड, चामोर्शी रोड, धानोरा रोड व चंद्रपूर रोड लगतचा परिसर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला. स्वच्छता अभियानांतर्गत लक्षवेध अकॅडमीचे संचालक प्राध्यापक राजीव सर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता ही कुणाच्या दबावाखाली येऊन करण्यासारखे काम नाही, आपल्याला निरोगी आणि स्वस्थ जीवनासाठी ही अत्यंत गरजेची सवय आहे. आपल्याला दैनंदिन जीवनात स्वच्छता अंगी बाळगलीच पाहिजे, स्वच्छ पर्यावरण आणि आदर्श जीवनशैली विकसित होण्यासाठी प्रत्येकाने ही सवय लावून घेतली पाहिजे, स्वच्छता ही समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नैतिक जबाबदारी आहे. सरकार आणि सामाजिक यंत्रणा त्यासाठी कार्यरत असतेच परंतु व्यक्तिगत स्तरावर देखील स्वच्छतेबाबत आपण सजग राहिले पाहिजे, आपले मन स्वच्छ तर घर स्वच्छ, आपले घर स्वच्छ तर आपला परिसर स्वच्छ या उक्तीप्रमाणे स्वच्छता राखण्याची जबाबदारी स्वतःपासून सुरू करावी त्यासाठी मी स्वतः परिसर स्वच्छ ठेवणार असा प्रण प्रत्येकाने करायलाच हवा असे देखील ते म्हणाले.
या कार्यक्रमाला लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे प्राध्यापक महेश सर तसेच अकॅडमीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.