गडचिरोली सी-६० च्या जवानांची मोटारसायकल ने ६५०० कि.मी.ची ‘शहिद सन्मान यात्रा’

170

– शहिदांच्या सन्मानार्थ २२ दिवसात केली मोटारसायकल ने ‘शहिद सन्मान यात्रा’
The गडविश्व
गडचिरोली, १८ जानेवारी : गडचिरोली पोलीस दलात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना शहीद झालेल्या पोलीस जवानांच्या सन्मानार्थ गौरवपुर्ण कामगिरीची ओळख देशभरात व्हावी, देशभरातील सर्व सुरक्षा यंत्रनांना सी-६० गडचिरोली जवानांचा त्याग व बलिदानाची माहिती कळावी यासाठी सी-६० च्या पाच जवानांनी मोटारसायकल ने ६५०० कि.मी.ची भ्रमंती करत ‘शहिद सन्मान यात्रा’ पूर्ण केली. सोमवार १६ जानेवारी रोजी हे गडचिरोती येथे परत आले असता मंगळवार १७ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी त्यांचा सत्कार केला.
किशोर गोपालदास खोब्रागडे, राहुल जाधव, रोहीत गोंगले, अजिंक्य हेमंत तुरे व देवानंद अडोले या पाच जवानांनी २५ डिसेंबर २०२२ पासून शहीद सन्मान सुरु केली व १६ जानेवारी २०२३ रोजी गडचिरोली येथे परतले.
यात्रेदरम्यान मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातच्या विविध ठिकाणांना भेटी दिल्या असून राजस्थानमधील पाकिस्तान सिमेलगत असलेल्या लोंगेवाला पोस्ट तसेच तानोतमाता मंदिर याठिकाणी भेटी दिल्या आहेत. या संपूर्ण यात्रेदरम्यान त्यांनी एकुण ६५०० कि.मी. चा प्रवास केला. तसेच सन्मान यात्रेदरम्यान बऱ्याच ठिकाणी जवानांचा स्वागत-सत्कार करण्यात आला. यात जैसलमेर (राजस्थान) येथे मिचेलकुमार सहा. पोलीस उप-निरिक्षक, पाकिस्तान बॉर्डरवर असलेल्या लोंगेवाला येथे आर्मी ऑफीसर, सुरत येथे अजय खार्डे (IRS), उपायुक्त, सुरत, संजय हजारे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, कशीमिरा पोलीस स्टेशन मुंबई, मुंबई बिकेसी बांद्रा येथे सीबीबाय ऑफीस मधील राजेश प्रधान सा. पोलीस उप- महानिरिक्षक, (CBI), विरेश प्रभु सा. पोलीस उप-महानिरिक्षक (CBI, DOP & T) भारत सरकार, यांनी स्वागत करुन पुर्ण सीबीआय ऑफीस मधील कार्यरत अधिकाऱ्यांसमोर कार्यक्रम घेतला. तसेच सुवेझ हक सा. पोलीस उप-महानिरिक्षक CBI (प्रतिबंधात्मक) मुंबई, यांनी स्वागत करुन जवानांसोबत चर्चा केली. सोबतच हरी बालाजी सा., पोलीस उपायुक्त मुंबई झोन-१ यांनी गेट वे ऑफ इंडीया येथे स्वागत केले. तसेच नागपूर येथे अमीतेश कुमार सा. पोलीस आयुक्त, नागपूर, छेरींग दोरजे सा. पोलीस महानिरिक्षक, नागपूर परिक्षेत्र, मा. श्रीमती. अस्वती दोरजे मॅडम, सह पोलीस आयुक्त, नागपूर, मा. श्री. संदीप पाटील सा., पोलीस उप-महानिरिक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, कॅम्प नागपूर, मा. मुम्माका सुदर्शन सा. पोलीस उपायुक्त, नागपूर व इतर ४ ते ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जवानांचे स्वागत करुन कार्यक्रम घेतला. मागिल वर्षी देखील सी-६० चे जवान लडाख पर्यंत जावून आले आहेत. आगामी काळात भारताची पुर्वसिमा ते पश्चिमसिमा अशी सन्मान यात्रा करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० ची व त्यांच्या जवानांची माहिती देशभरातील सर्व सुरक्षा यंत्रणांना व सामान्य नागरिकांना व्हावी हाच या शहिद सन्मान यात्रेमागचा हेतू आहे.

गडचिरोली दुर्गम-अतिदुर्गम, वनसंपदेने नटलेला, आदिवासी संस्कृती अशी ओळख असलेला जिल्हा पण विकासापासून बऱ्याच अंशी दूर ज्याला कारण आहे येथे फोफावलेला नक्षलवाद व नक्षलवादयाच्या देशद्रोही कारावाया. गडचिरोली जिल्हयातील नक्षल कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी ०१ डिसेंबर १९९० रोजी गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील ६० शारीरिकदृष्टया तंदुरुस्त व चपळ पोलीसांचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकास कंमाडो – ६० असे संबोधण्यात येते तसेच विशेष अभियान पथक या नावाने देखील ओळखण्यात येते. वीरभोग्या वसुंधरा हे सी- ६० पथकाचे ब्रीदवाक्य असून नक्षलवादयांचा कर्दनकाळ म्हणून आज हे पथक देशभरात नावाजले गेले आहे.
नक्षलविरोधी कारवाया करताना सी-६० च्या जवानांना अत्यंत कठिण परिस्थीतीत अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता वर्षाचे बाराही महिने अहोरात्र जीवाची पर्वा न करता डोंगरदऱ्या, घनदाट झाडीत अभियान राबवून आपले कर्तव्य पार पाडत असतात. अभियानादरम्यान जवानांना जंगलातच चुल पेटवून, ओढया नाल्यातील पाण्याचा वापर करून पाठीवरुन वाहून नेलेल्या पिट्टूमधील तांदूळ आणि डाळीचे जेवण बनविले जाते. परिस्थीतीशी सामना करताना कधी पाण्याअभावी तर कधी वेळेअभावी जेवण ही बनविणे शक्य होत नाही. अशावेळी उपाशी पोटी दिलेले उद्दिष्ट पुर्ण करण्याकरीता सर्व जाबाज कमांडो कार्यरत असतात. अलिकडे २३ डिसेंबर २०२२ ला झालेल्या टेकामेटा जंगल परिसरात पोलीस – नक्षल चकमकीत ०२ जहाल नक्षली मृत्यूमुखी पडले या अभियानात सी- ६० चे बहादूर जवान प्राणपणाने लढताना सलग दोन दिवस उपाशी राहून आपल्या कर्तव्यावर दटून होते. अशाप्रकारे सी-६० चे जवान अनेक आव्हानांना सामोरे जावून नक्षलवादयांच्या देशद्रोही कारवाया रोखण्यासाठी सदैव तत्पर आहेत.
नक्षलवादयांशी लढताना गडचिरोलीमध्ये आतापर्यंत २१२ वीर पोलीस जवान शहीद झाले असून, यात ६२ शहीद सी-६० चे आहेत. गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या शौर्यपुर्ण कामगिरीसाठी ०३ शौर्य चक्र, ०६ राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक, १६ गुणवत्तापुर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक व १६१ पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले असून, यातील बहुतांश पदके हे सी-६० च्या जवानांना मिळालेले आहेत.
या सर्व गौरवपुर्ण कामगिरीची ओळख देशभरात व्हावी, देशभरातील सर्व सुरक्षा यंत्रनांना सी-६० गडचिरोली जवानांचा त्याग व बलिदानाची महती कळावी यासाठी सी-६० च्या जवानांनी हि ‘शहिद सन्मान यात्रा’ केली.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Tejasvi Surya) (Crystal Palace vs Man United) (Wolves vs Liverpool) (SBI PO Prelims Result) (JEE Main 2023 Admit Card) (Shahid Samman Yatra )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here