गडचिरोली : रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या इसमाचा मृतदेह नदीपात्रात सापडला

193

The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : भामरागड तालुक्यातील दलशु पुशु वडे (वय ५५) या तेंदु पत्ता कामगाराचा मृत्यू रहस्यमय परिस्थितीत झाल्याने खळबळ उडाली आहे. गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातून अचानक बेपत्ता झाल्यानंतर पाचव्या दिवशी त्यांचा मृतदेह कोटगल बॅरेजजवळच्या नदीपात्रात आढळून आला.
१० मे रोजी बैलबंडीवरून पडून गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना भामरागड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढे अहेरी आणि नंतर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. ११ मे रोजी तेथे भरती करण्यात आले होते, तर १५ मे रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती.
मात्र, १४ मे रोजी रात्री जेवणानंतर ते अचानक रुग्णालयातून बेपत्ता झाले. नातेवाईकांनी तत्काळ गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
१६ मे रोजी सकाळी ११ वाजता कोटगल बॅरेजजवळील नदीपात्रात एक मृतदेह सापडला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ओळख पटवली असता तो दलशु पुशु वडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. रुग्णालयातून अचानक बेपत्ता होणं आणि त्यानंतर मृतदेह सापडणं या सगळ्या घडामोडींमुळे संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #ipl2025 #latestnews #breakingnews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here