गडचिरोली : रानटी हत्तींचा कळप पोहचला सेमाना नजीकच्या जंगल परिसरात

3329

– परिसरात भीतीचे वातावरण
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : दोन वर्षापूर्वी ओडिसा राज्यातून छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेला रानटी हत्तींचा कळप आता जिल्हा मुख्यालयानजीकच्या सेमाना जंगल परिसरात दाखल झाला असून रविवार २९ सप्टेंबर रोजी रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास गडचिरोली – शिवनी मार्गावरील सेमाना देवस्थान पुढे वाकडी फाटा नजीकच्या मुख्य मार्गावर रानटी हत्तींचा कळप दिसून आला. जवपास २५-३० च्या संख्येत असलेला हा हत्तींचा कळप जिल्हा मुख्यालयानजीक दाखल झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून हत्ती बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
ओडिसा राज्यातून दोन वर्षापूर्वी रानटी हत्तीचा कळप गडचिरोलीत जिल्ह्यात दाखल झाला. दरम्यान हा कळप लगतच्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील जंगल परिसरात भिरकटला होता. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त परिसर व मोठ्यां प्रमाणात बांबू, पाण्याचे साठे, राहण्यासाठी चांगले वातावरण असल्याने हा रानटी हत्तींचा कळप जिल्ह्यातील धानोरा, कोरची, कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली तालुक्यात यापूर्वी भिरकटला. काही दिवसांपासून हा कळप कुरखेडा तालुक्यातून आरमोरी तालुक्यातील देऊळगाव, शिर्शी जंगल परिसरात होता. त्यानंतर पोर्ला वनविभागातील नवरगाव, कोंडाणा – काटली परिसरात दाखल झाला. या दरम्यान हत्तीच्या कळपाने शेतकऱ्यांचे उभे धान पिके व इतर पिके पायाखाली तुडविले. तर काल परवा हा कळप पुढे मार्गक्रमण करीत दिभणा जंगल परिसरात दाखल होत धान शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले. आता हा कळप २९ सप्टेंबर क्या सकाळी दिभणा कसून मार्गक्रमण करीत चांदाळा – गुरवळा जंगल परिसरात दाखल झाला होता तर सायंकाळच्या सुमारास हा कळप गडचिरोली – चामोर्शी मार्गावर असलेल्या सेमाना नजीकच्या वाकडी फाटा नजीक मुख्य मार्गावर मार्गक्रमण करतांना दिसून आला. जवळपास ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास हा कळप मुख्य मार्गावर दिसून आल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. वनाधिकारी या ठिकाणी दाखल होत रानटी हत्तीच्या जवळ जाण्यास मज्जाव करीत होते. दरम्यान आता हा कळप सेमाना नजीकच्या वाकडी जंगल परिसरात पोहचल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले असून वनविभाग आपल्या चमुसह रानटी हत्तीच्या कळपावर पाळत ठेऊन आहे. सकाळी नागरिक सेमाना परिसरात फिरावयास जात असतात त्यामुळे त्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहनही वनविभागाकडून करण्यात येत आहे. आता हा हत्तींचा कळप कोणत्या परिसरात मार्गक्रमण करणार याकडे सुद्धा अनेकांचे लक्ष लागले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchiroliforest #wildelephant #semanajungal #wakadijungal #forest #elephant #breakingnews )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here