The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडान’ उपक्रमांतर्गत माओवादग्रस्त आणि दुर्गम भागातील ३० युवक-युवतींना मत्स्यपालन प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांचा निरोप समारंभ नुकताच पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे उत्साहात पार पडला.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली व बिओआय आरसेटी, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने १० दिवसांचे प्रशिक्षण १२ जुलै ते २१ जुलैदरम्यान घेण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांना एक किलो मत्स्यबीज वाटप करून त्यांना स्वावलंबनाची पहिली पायरी गाठण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
समारंभात अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरवले. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी शेतीसोबत जोडव्यवसायांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे सांगून मत्स्यपालनासारख्या उपक्रमातून उद्योजक घडण्याची संधी असल्याचे नमूद केले. “आजचे बीज हे उद्याचा वटवृक्ष आहे,” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमासाठी आरसेटीचे समन्वयक हेमंत मेश्राम उपस्थित होते. यशस्वी आयोजनासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस ठाण्यांचे प्रभारी, नागरी कृती शाखेचे प्रभारी पोउपनि. चंद्रकांत शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.
‘प्रोजेक्ट उडान’द्वारे केवळ प्रशिक्षण नव्हे, तर दुर्गम भागातील तरुणाईला भविष्यातील सक्षम उद्योजक बनविण्याचा प्रयत्न पोलीस दल करत आहे, हे या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #गडचिरोली #प्रोजेक्टउडान #गडचिरोलीपोलीस #मत्स्यपालन #स्वयंरोजगार #माओवादग्रस्तक्षेत्र #आरसेटी #युवासशक्ती #ग्रामीणविकास #उद्योगशक्ती
#Gadchiroli #ProjectUdaan #GadchiroliPolice #FishFarming #SelfEmployment #YouthEmpowerment #SkillDevelopment #RuralDevelopment #Entrepreneurship #MaoistAffectedAreas
