-मुस्का येथील महिलांचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : धानोरा तालुक्यातील मुस्का या गावातून अवैध दारूविक्री हद्दपार करण्यासाठी मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी शर्तीचे प्रयत्न सुरु केले आहे. नुकतेच महिलांनी गावात बाजा बजाओ आंदोलन करून दारू विक्रेत्यांना शेवटची ताकीद दिली आहे. यानंतरही अवैध व्यवसाय करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाईची तंबी देण्यात आली आहे.
मुस्का गावात काही दिवसापूर्वी मुक्तीपथ-शक्तिपथ गावसंघटनेने दारुविक्रेत्याला सुचना देऊन अहिंसक कृती, रॅलीद्वारे गावात दारूविरोधात वातावरण निर्माण केले होते. तरीसुद्धा काही विक्रेते मुजोरीने लपून दारू विक्री करीत होते. मुस्का हे गाव मध्यभागी असून सभोवतालील गावातील लोक दारू प्यायला येथे गर्दी करीत होते. परिणामी गावात व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. महिलांना आर्थिक, सामाजिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन गावातील महिलांनी आपल्या गावातून अवैध दारूविक्री हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मुक्तिपथ तालुका टीमने महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यानंतर महिलांनी दारूबंदीचा ठराव घेऊन गावातील दारूबंदी जोपर्यंत होणार नाही, तो पर्यंत आम्ही माघार घेणार नाही असा ईशारा दारुविक्रेत्याना तसेच दारू पिणाऱ्या लोकांना दिला.
अवैध दारूविक्री विरोधात महिलांनी लढा सुरु केला. त्यानुसार महिलांनी दारूविक्रेत्यांना अवैध व्यवसाय बंद करण्याचा इशारा दिला. काही विक्रेत्यांनी न जुमानता अवैध व्यवसाय सुरूच ठेवला त्यांच्याविरोधात अहिंसक कृती करीत त्यांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. यासह विविध उपक्रम घेऊन गावाला दारूमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. तरीसुद्धा काही विक्रेते चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय करीतच आहेत. त्यामुळे नुकतेच महिलांनी गावातील मुख्य चौकात बाज बजाओ आंदोलन करून दारूविक्रेत्यांना शेवटची ताकीद दिली. आताही दारूबंदी न झाल्यास पोलीस स्टेशन येथे मोर्चा नेऊ असेही ठरविण्यात आले आहे. या आंदोलनात पोलीस पाटिल देवांगना वासनिक यांच्या नेतृत्वात शक्तिपथ संघटनेच्या महिला सिंधुबाई कुदेशी, गीताबाई चोपडे, बेबिबाई ठलाल, कांताबाई गेडाम सह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाले होते.
