– ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
The गडविश्व
सावली दि. ०४ : सावली तालुक्यातील पाथरी उपवन परिक्षेत्रातील जंगलालगतच्या शेतशिवारात आज सकाळी वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पाथरी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक १६६२ मध्ये ल घडली. पांडुरंग भिका चचाने (वय ६२, रा. पाथरी) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
रोजप्रमाणे पांडुरंग चचाने हे सकाळी शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. सकाळी अंदाजे ९ वाजताच्या सुमारास ते गवत कापत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. वाघाने शेतकऱ्याला जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत ओढत नेले.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक तरसे, वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, क्षेत्रसहायक पाटील यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तत्काळ मदत म्हणून मृतकाच्या कुटुंबीयांना वनविभागाकडून ५० हजार रुपयांची आर्थिक सहाय्य देण्यात आले.
दरम्यान, परिसरात वाघिणीसह पिल्ले असल्याचे वनविभागाच्या प्राथमिक तपासणीत समोर आले असून, या भागात वाघाची दहशत अधिक वाढली आहे. नागरिक व शेतकरी भीतीच्या छायेत असून, वनविभागाने वाघाला जेरबंद करण्यासाठी कॅमेरे बसवले असून पुढील कारवाई सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chandrpurnews #सावली #पाथरी #वाघहल्ला #शेतकरीमृत्यू #वनविभाग #गडचिरोली #मानवनुकसान #ग्रामीणबातमी #MaharashtraNews #TigerAttack














