– नुकसानभरपाईची दिवाकर भोयर यांची मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २६ : धानोरा तालुक्यात अवकाळी वादळी पावसाने रब्बी हंगामातील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. मुसळधार पावसामुळे शेतातील पिके आडवी झाली असून, काही ठिकाणी धान्याला अंकुर फुटले आहेत. कापलेले पीक पाण्यात तरंगताना दिसत आहे, तर काही ठिकाणी ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
तालुक्यातील रांगी, निमगाव, खेडी,चिंगली, महावाडा व धानोरा या भागांत वीज कडकडाटासह वादळी पावसाचा प्रकोप दिसून आला. या भागातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यांच्या आयुष्यावर गदा आली आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते दिवाकर भोयर यांनी प्रशासनाकडे तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून योग्य ती आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळाली नाही, तर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून त्यांच्या जखमांवर मदतीचा मलम लावावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शेतकऱ्यांची ही व्यथा लक्षात घेता शासनाने त्वरीत पावले उचलावी, हीच शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे.
