The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०२ : येथील रांगी मार्गावरून जात असतांना दुचाकीने झाडाला दिलेल्या धडकेत दुचाकी चालक शिक्षक जागीच ठार झाल्याची घटना ३१ जुलै २०२४ रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
धानोरा पासुन अवघ्या २ कि.मी. अंतरावर रांगी मार्गावरील काशीराम तुलाविटोला येथे ही घटना घडली. चालक नरेंद्र पेंदाम (अंदाजे वय ५१) रा. धानोरा असे मृतक शिक्षकाचे नाव असून ते पंचायत समिती धानोरा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करेमरका येथे शिक्षक पदावर कार्यरत होते. ते स्वतःच्या एम एच ३३ आर ८६३८ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने वैयक्तिक कामानिमित्त धानोरा वरून जवळच असलेल्या काशीराम तुलाविटोला टोला येथे जात होते. परंतु समोरून येणाऱ्या चार चाकी अज्ञात वाहनाचा प्रकाश डोळ्यांवर पडल्याने समोरचा अंदाज न आल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना त्वरित धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथिल डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्याच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice )