धानोरा : सुबाभूळ लाकडाचा ट्रक पलटला, चालक व क्लिनर जखमी

52

– नागरिकांच्या सतर्कतेने जीवितहानी टळली
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २८ : चंद्रपूर जिल्ह्याकडे जाणाऱ्या सुबाभूळ लाकडांनी भरलेल्या ट्रकचा अपघात आज सकाळी साडेसातच्या सुमारास धानोऱ्यातील शिवाजी चौकात झाला. ट्रक पलटल्याने दोन जण जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
एम. एच. ४० सीएम ९३१० क्रमांकाचा ट्रक ओडिशावरून सुबाभूळ लाकडे घेऊन बल्लारशहाकडे जात असताना शिवाजी चौकात रस्त्यावरील उंच उतारावरून त्याचे संतुलन बिघडले. त्यामुळे ट्रक उलटला. या अपघातात ट्रकचालक मदन भोयर (५५) व क्लिनर हरीश बानोत (२८), दोघेही रा. बल्लारशहा, हे जखमी झाले.
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत दोघांनाही ट्रकच्या केबिनमधून सुखरूप बाहेर काढले. दोघांनाही हात, डोके व पायाला दुखापत झाल्याने त्यांना धानोऱ्याच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या मार्गावरील रस्त्याचे काम सध्या सुरू असून, कंत्राटदाराने दोन्ही बाजूंनी रस्ता खोदल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावर चिखल व असमतोल उतार असल्याने वाहनांची वाहतूक धोकादायक ठरत आहे. दररोज प्रवासी, शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना या मार्गावरून मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिकांनी कंत्राटदाराने रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. प्रशासनानेदेखील याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here