– प्रवाशांच्या जिवाला धोका; नागरिकांची पोल बदलण्याची मागणी
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि.१४ : तालुक्यातील राजोली फाट्याजवळील एकल सेंटरच्या लगतचा विद्युत पोल वरून तुटून लोंबकळत असून, त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या हा पोल विद्युत तारेच्या आधारावर लटकलेला आहे. मात्र महावितरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सदर तुटलेला पोल गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक स्थितीत आहे. परिसरातून रोज शालेय विद्यार्थी, प्रवासी नागरिक व वाहनधारक ये-जा करतात. एखाद्या क्षणी पोल कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी महावितरण विभागाने तत्काळ दखल घेत संबंधित ठिकाणी नवीन पोल बसवून संभाव्य अपघात टाळावेत, अशी जोरदार मागणी राजोली बस स्टँड परिसरातील नागरिकांनी केली आहे. योग्य वेळी उपाययोजना न झाल्यास नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
