बांधकाम कामगारांना नोंदणीसह सर्व सुविधा मिळणार एकाच छताखाली

686

– कामगार कल्याणकारी मंडळाच्या तालुकास्तरीय सेतु केंद्राचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
The गडविश्व
मुंबई, दि. ०५ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी व नूतनीकरणासह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील तालुकास्तरावर सुरु करण्यात आलेल्या तालुका कामगार सुविधा केंद्रांचे (सेतु) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बांधकाम कामगारांच्या सुविधेकरिता तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर समिती सभागृहात झालेल्या समारंभास मंत्री सर्वश्री दादाजी भूसे, संजय राठोड, अतुल सावे, राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद-सिंघल, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार आदी उपस्थित होते.
प्रधान सचिव श्रीमती वेद-सिंघल यांनी या सेतु केंद्राची माहिती दिली. या सेतु केंद्राद्वारे बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकर व लाभ वाटपाचे अर्ज व मुळ कागदपत्रे सादर करता येणार आहेत. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठीही हे केंद्र मदत करणार आहे. मंडळाने आतापर्यंत राज्यात जिल्हास्तरावर ४२ कामगार सुविधा केंद्र स्थापन केली आहेत. या केंद्रांशिवाय आता राज्यातील ३५८ तालुक्यात ही कामगार सुविधा केंद्र सुरु होत आहेत. यामुळे कामगांरासाठी नोंदणी, नूतनीकरण व लाभाच्या अर्जावर सुलभ प्रक्रीया करता येणार आहे. यामुळे कामगारांच्या वेळेत व खर्चात बचत होणार आहे. मंडळाच्या सर्वच सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या केंद्रावर व्यवस्थापक, तीन डेटा एन्ट्री ऑपरेटर व मदतनीस असे पाच जणांचे मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #kamgar #kamgarkalyanmandal)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here