गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमात “भारतीय संविधान” विषय होणार सुरू

369

– पुढच्या सत्रा पासून अंमलबजावणी करण्याचा विद्यापीठाचा मानस
The गडविश्व
गडचिरोली, दि.२४ : गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता भारतीय संविधान विषय म्हणून सुरू करण्यास राज्यशास्त्र अभ्यासमंडळ व मानवविज्ञान विद्याशाखेने मंजूरी प्रदान केली आहे. पुढच्या सत्रा पासून याची अंमलबजावणी करण्याचा विद्यापीठाचा मानस असून याकरिता विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी विशेष प्रयत्न केले आहे असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

गोंडवाना विद्यापीठात साजरा होणार संविधान महोत्सव

गोंडवाना विद्यापिठाची अधिसभा कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या अधीसभेत
डॉ. मिलींद भगत यांनी संविधान सन्मान महोत्सव साजरा करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता .सदर प्रस्तावाला दीपक धोपटे यांनी अनुमोदन दिले तसेच सर्वानुमते हा ठराव पारित करण्यात आला.
भारतीय राज्यघटनेची उद्देशिका हे संविधानाची मूलभूत तत्वे आणि उद्दिष्ट सांगणारे प्रास्ताविक विधान आहे. भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आणले. भारतीय संविधानाची उद्देशिका ही आपल्या संविधानाचे एक संक्षिप्त स्वरूप आहे. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतीय संविधान लागू झाल्याला ७४ वर्ष पूर्ण होऊन ७५ व्या वर्षात म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. जगात सर्वात मोठा लोकशाहीचा देश म्हणून भारत ओळखला जातो आणि या लोकशाहीचे संवर्धन करून तिला बळकट करण्याचे काम भारतीय संविधान करीत आहे . भारतीय संविधानाने समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या शास्वत मुल्यांची देण भारतीयांना केवळ दिलीच नाही तर प्रत्येकात रुजवली आहे. विद्यार्थ्यांमध्ये संविधानीक नितीमत्ता निर्माण करणे हे विद्यापीठाचे उद्दिष्ट असल्याचे विद्यापीठ कायद्यात नमूद आहे, म्हणून अमृत महोत्सवी वर्षात प्रवेश करीत असताना विद्यापीठाच्या नव्याने निर्माण होणाऱ्या शैक्षणिक परिसराच्या किंवा विद्यापीठाच्या दर्शनी भागात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचा शिलालेख उभारल्यास संविधाना प्रती कृतज्ञता व्यक्त करता येईल व संविधानातील नितीमत्ता निर्माण करण्याच्या विद्यापीठाच्या उद्दिष्टाची पूर्तता करता येईल. तसेच विद्यापीठाने संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन करून त्याद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे तसेच विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन करण्याच्या सूचना द्याव्या व संविधान सन्मान महोत्सव साजरा केल्याचे महाविद्यालयाकडून अहवाल प्राप्त करून घ्यावा, अश्याप्रकारे संविधान सन्मान महोत्सव आयोजित केल्याने निश्चितच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकामध्ये संविधान जागृती व संविधानातील नीतिमत्ता निर्माण करण्यास गोंडवाना विद्यापीठाचे योगदान राहील या उद्देशाने हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

सदर प्रस्तावावर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रामार्फत भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्ताने संविधान सन्मान महोत्सवाचे वर्षभरात आयोजन करण्यात येईल असे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी सांगितले. यासाठी रु.५.०० लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सदर महोत्सव संलग्नीत महाविद्यालयांमध्ये सुध्दा साजरा करुन त्याबाबतचा अहवाल मागविण्यात येईल, तसेच महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीतानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात यईल तसेच विद्यापीठाच्या अडपल्ली येथील नविन कॅम्पसमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख दर्शनी भागावर उभारण्यात येईल असा सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here