The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : शेतकऱ्यांच्या समस्या, अव्यवस्थेचा विळखा आणि शासनाच्या दुर्लक्षाविरोधात काँग्रेस पक्षाने २२ एप्रिल रोजी आरमोरी तालुक्यातील देऊळगाव येथे भव्य चक्काजाम आंदोलन छेडले. गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात आणि आमदार रामदास मसराम यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर-गडचिरोली महामार्गावर तब्बल एक तास वाहतूक रोखण्यात आली.
शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतीचे नुकसान होत असून, रानटी हत्तींचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. डिमांड भरूनही विद्युत मीटर अथवा सोलर पंप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. दुसरीकडे, पुलखलं परिसरातील सुपीक जमिनी विमानतळासाठी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांच्या विरोधात सुरू असून, चामोर्शी-भेंडाळा परिसरात एमआयडीसीसाठी अधिग्रहण करताना शेतकऱ्यांशी कुठलीही चर्चा न करता अतिशय कमी दर देण्यात येत आहेत.
याशिवाय जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रे व राईस मिलमध्ये सुरू असलेल्या घोटाळ्यांवर आळा घालून उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर कडक कारवाई व्हावी, धानाला बोनस जाहीर करावा, सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, घरकुल योजनेसाठी रेतीची उपलब्धता सुनिश्चित करावी, मनरेगाअंतर्गत थकीत रक्कम तत्काळ वितरित करावी, राष्ट्रीय महामार्ग व इतर रस्त्यांची कामे मान्सूनपूर्व पूर्ण करावीत आणि शासकीय विभागांतील रिक्त पदे तातडीने भरून सामान्य जनतेची होणारी गैरसोय दूर करावी, अशा विविध मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी मांडल्या.
दरम्यान प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. आंदोलनात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शेतकरी, महिला, युवक व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
