– अल्पवयीन विद्यार्थिनींवर सातत्याने अत्याचार, धमक्या देत गप्प बसवण्याचा प्रयत्न
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : जिल्ह्यातील भामरागड येथे जिल्हा परिषद समुह निवासी शाळेच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. वस्तीगृहातील वार्डनच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. विद्यार्थिनींना सातत्याने अश्लील वागणूक देणाऱ्या नराधमाला भामरागड पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरोधात कठोर कारवाई सुरू आहे.
८ मार्च २०२५ रोजी जगतीक महिला दिनी वस्तीगृहातील वार्डन विद्यार्थिनींना गुड टच-बॅड टच यासंदर्भात माहिती देत असताना, अशा प्रकारच्या त्रासाविषयी न घाबरता सांगावे, असे सांगितले. दुसऱ्याच दिवशी, ९ मार्च २०२५ रोजी काही विद्यार्थिनींनी धाडसाने पुढे येत मुख्याध्यापकाच्या विकृत वागणुकीविषयी सांगितले. मुख्याध्यापक मालु नोगो विडपी (वय ५०) याने जुलै २०२४ पासून विविध ठिकाणी विद्यार्थिनींना एकटे बोलावून अश्लील कृत्ये केली. याबाबत कुणालाही सांगितल्यास मारण्याची, बलात्कार करण्याची आणि शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली होती.
दरम्यान पालकांनी तातडीने भामरागड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि ११ मार्च २०२५ रोजी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्याध्यापकाला अटक केली. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ७४, ७५(२), ३५१(२)(३) तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत कलम ८, १०, १२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
११ मार्च रोजी अटक केल्यानंतर अहेरी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक धनश्री सगणे करत आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी कठोर भूमिका घेत नराधमाला अटक केली असून, “अल्पवयीन मुलींवरील अशा घृणास्पद प्रकारांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही. कठोर कारवाई करून आरोपीला कमाल शिक्षा दिली जाईल!” असा ठाम इशारा पोलिसांनी दिला आहे.
