मोहगाव येथे सात दिवशीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण संपन्न

187

The गडविश्व
ता.प्र /धानोरा, ७ मार्च : राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नवी दिल्ली, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ, आनंद, गुजरात आणि अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२३ या दरम्यान ७ दिवशीय शास्त्रोक्त मधुमक्षिका पालन या विषयावर धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे प्रशिक्षण पार पडले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्रीमती शोभाकाकू फडणवीस, माजी अन्नपुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी मधुमक्षिका पालन हे कशा पद्धतीने आदिवासी भागामध्ये रोजगार निर्मितीसाठी उपयोगी आहे व मधमाशी पासून मिळणारे विविध उत्पादने यांविषयी माहिती देत उत्पादनांचे विक्रीव्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. प्रदीप तुमसरे, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी मधमाशी पालनाकडे पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांचा कल वाढवण्याकरिता शासनातर्फे अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यातील काही योजनांना अनुदानसुद्धा दिले जाते याची माहिती दिली. पर्यावरण पूरक प्रत्येक गोष्टीत जोपासनेवर भर देताना कृषी विकासात विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज आहे. गडचिरोली सारख्या जंगल क्षेत्रात हा उत्तम व्यवसाय होऊ शकतो असे प्रतिपादन केले.
आनंद एम. पाल, तालुका कृषी अधिकारी, धानोरा यांनी शास्त्रीय पद्धतीने व विज्ञानाची जोड देऊन मधमाशी पालन केल्यास पर्यावरणाचा समतोल राखणे याबरोबरच मधमाशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये परागीभवनाचे काम सातत्याने करीत असतात, परागीभवनामुळे शेती व शेतीतील उत्पादनात लक्षणीय वाढ होते. त्यामुळे फुलाला होणारा स्पर्श हा परीसस्पर्श समान असून शेतीसाठी मधुमक्षिका वाचवणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
प्रशांत गावडे प्रशिक्षण समन्वयक आणि मधमाशी तज्ञ कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांनी मधमाशीच्या विविध जाती, मधमाशीचे परागीभवनात महत्व, कृत्रिमरित्या राणी माशीची पैदास, मधमाशी पासून मिळणाऱ्या अनमोल अशा राजान्न पदार्थाचे उत्पादन, मधमाशीच्या विषाचे उत्पादन इत्यादी तसेच मधमाशांचे कीड रोग आणि शत्रू व त्यांचे व्यवस्थापन, मधमाशी पालनासाठी योग्य जातीची निवड, तसेच स्थलांतर, व्यासायिक दृष्ट्या विविध अनुदानित योजना अशा विविध विषयांवर परिपूर्ण मार्गदर्शन केले. उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना खादी व ग्रामोद्योग मंडळ, याविषय माहिती दिली
सचिन क्षीरसागर मधमाशी तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मधमाशीची हाताळणी, नैसर्गिक पद्धतीने शुद्ध मधाची काढणी, मधमाशी पालनासाठी लागणारे विविध साहित्य, मधमाशी पासून जास्तीत जास्त मधाचे उत्पादन घेण्यासाठी फुलोऱ्याचे व्यवस्थापन, इत्यादी गोष्टींची प्रात्यक्षिकांसहित परिपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमाच्या समारोपीय दिवशी देवसाय आतला अध्यक्ष धानोरा तालुका शेतकरी उत्पादक कंपनी यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना जागतिक बाजारपेठेत मधमाशीपासून मिळणाऱ्या पदार्थांचे महत्व व्यक्त करत मधमाशी उद्योजक घडवण्याचे आवाहन केले व उपस्थित प्रशिक्षणार्थ्यां बरोबरच सदर विषयांतील शंका निरसन करून अधिकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी धानोरा तालुक्यातील मोहगाव व सदर परिसरातील २५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The Gdv)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here