बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रावर आता वन प्रबोधिनीचे प्रशासकीय नियंत्रण

332

The गडविश्व
चंद्रपूर, २३ जून : चिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रशासकीय नियंत्रण आता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा पदसिध्द संचालक, चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. याबाबत महसूल व वनविभागाने २० जून २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
महाराष्ट्रातील वनक्षेत्रापैकी जवळपास १३ टक्के क्षेत्रावर बांबु आढळत असून राज्यातील बांबु उत्पादनापैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त बांबु गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात आढळतो. नैसर्गिक व खाजगी क्षेत्रात बांबु लागवड व योग्य व्यवस्थापन करून बांबुच्या उत्पादनामध्ये तसेच बांबुवर आधारीत उद्योजकांना चालना देणे व बांबुचा मुल्यवर्धित उपयोग वाढविण्याकरीता २०१४ मध्ये नवीन बांबु धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
या केंद्राचे प्रशासकीय नियंत्रण महाराष्ट्र राज्य बांबु विकास महामंडळाकडे हस्तांतरण करण्यात आले होते. तसेच प्रधान मुख्य वनसरंक्षक (वनबल प्रमुख) यांच्या १४ मार्च २०२३ च्या पत्रानुसार बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे आतापर्यंत मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) चंद्रपूर यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली होते. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीचे पदसिध्द संचालक हे महाराष्ट्र वनविभागातील संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण या तीन क्षेत्रात कार्य करतात. तसेच महाराष्ट्रात बांबु क्षेत्रात संशोधन व प्रशिक्षणाच्या उद्देशाने चिचपल्ली (चंद्रपूर) येथे बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे हे चिचपल्ली येथील प्रशिक्षण केंद्र अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन प्रबोधिनीचे संचालक यांच्या नियंत्रणाखाली आल्यास सदर संस्थेचा बांबु क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण विषयक उद्देश यशस्वी होण्यास मदत होईल.
त्यानुसार चिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रशासकीय नियंत्रण आता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन प्रबोधिनीचे संचालक यांच्याकडे हस्तांतरण करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
(the gdv, the gadvishva, chandrpur, bambu sanshodhan, mahaforest)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here