चोप गावातील जंगलात विस्मृतीत गेलेल्या प्राचीन हेमाडपंथी मंदिराला नवसंजीवनी

82

– तरुणांच्या स्वच्छता मोहिमेला ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, दि. १६ : तालुक्यातील चोप गावालगतच्या कसारी रोडवरील दाट जंगलात लपलेले प्राचीन हेमाडपंथी मंदिर अनेक वर्षांपासून उपेक्षित, जीर्ण अवस्थेत होते. मंदिराचा परिसर झाडाझुडपांनी झाकला गेला होता, त्यामुळे स्थानिकांनाही या मंदिराबाबत फारशी माहिती नव्हती. मात्र, चोप येथील दुर्गा उत्सव मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत या ऐतिहासिक मंदिराला नवसंजीवनी देण्याचा निर्धार केला आणि स्वखर्चाने मोठ्या उत्साहात स्वच्छता मोहीम राबवली.
या उपक्रमात मंदिराभोवती वाढलेली झाडेझुडपे, गवत, प्लास्टिक व कचरा हटवून परिसराला स्वच्छ, पवित्र आणि सुरक्षित रूप देण्यात आले. मंदिराच्या सभोवतालची जागा स्पष्टपणे दिसू लागली असून, परिसरात शांतता आणि पावित्र्याची अनुभूती मिळू लागली आहे. या मोहिमेत शेखर कुथे, तुशांत उईके, मुन्ना राऊत, सूरज बावणे, निलेश राऊत, घनशाम उईके, दीपक पंडेल, विशाल मेश्राम, मनीष पांलादूरकर आणि रमेश दूधबर्वे या तरुणांनी पुढाकार घेतला. त्यांनी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय आपल्या साधनसामग्रीसह स्वतःचा वेळ आणि श्रम अर्पण केले.
या तरुणांचे गावकऱ्यांनी मनःपूर्वक कौतुक केले आहे. मंदिराच्या स्वच्छता कार्यात सर्पमित्रांचाही मदतीचा हात मिळाल्याने मोहिम सुरक्षित वातावरणात पार पडली. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून, गावाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचे प्रतीक आहे. मात्र दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्यामुळे मंदिराचे स्वरूप मोडकळीस आले होते.
या स्वच्छता मोहिमेनंतर गावातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी शासनाकडे विनंती केली आहे. “हेमाडपंथी मंदिर हा आमचा सांस्कृतिक ठेवा असून त्याचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. शासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे,” असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे. तसेच मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था आणि धार्मिक संघटनांनी पुढे यावे, अशीही त्यांनी विनंती केली.
या मोहिमेमुळे चोप गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत तरुणांच्या कार्याला ‘प्रेरणादायी पाऊल’ असे संबोधले आहे. भविष्यात या मंदिराचा धार्मिक व पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास गावाच्या प्रगतीस नवे दालन खुले होईल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या उपक्रमातून चोप गावाने एक आदर्श उभा केला आहे, जो इतर गावांनाही त्यांच्या वारसास्थळांच्या संवर्धनासाठी प्रेरणा देणारा ठरेल, यात शंका नाही. मंदिर परिसरात पुन्हा एकदा भक्तांची पावले वळावीत, यासाठी सर्वपक्षीय आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांची अपेक्षा व्यक्त होत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #desaiganj #hemandpanthi #latestnews #breakingnews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here