– पालकांचा अमृत मेहर व नसिर हाश्मी यांना हृदयस्पर्शी आभार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : रामटेक (जि. नागपूर) येथील ज्ञानदीप कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज, शितलवाडी येथे घडलेल्या घृणास्पद लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर आदिवासी मुलींच्या सुरक्षिततेसाठी आम आदमी पार्टीने राबविलेल्या अभियानाला आज यश मिळाले आहे. या प्रकरणात गडचिरोली प्रकल्पातील दहा आदिवासी मुलींना (इयत्ता तिसरी) रामटेकहून परत आणून गडचिरोलीतील नामांकित इंग्रजी माध्यम शाळेत सुरक्षितपणे दाखल करण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेत आपचे जिल्हा सचिव अमृत मेहर यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा अध्यक्ष नसिर हाश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. जिल्हा प्रशासन व आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने मुलींचे समायोजन सुरळीत पार पडले. यशस्वी समायोजनानंतर पालकांनी आप नेत्यांचे मनापासून आभार मानले.
आज सकाळी सर्व मुलींची जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर तात्काळ त्यांना गडचिरोलीतील इंग्रजी माध्यम शाळेत प्रवेश देण्यात आला. पालकांनी यावेळी समाधान व्यक्त करत सांगितले की, “आपच्या हस्तक्षेपामुळे आमच्या मुलींना भीतीतून मुक्तता आणि सुरक्षित वातावरण मिळाले. अमृत मेहर यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला न्याय मिळाला.”
पालकांनी जिल्हा अध्यक्ष नसिर हाश्मी, जिल्हा संघटक ताहीर शेख, सहसंघटक चेतन गहाणे, युवा अध्यक्ष साहिल बोदेले, उपाध्यक्ष राहुल मेश्राम, रोहित गायकवाड आणि आदित्य ओंपाकला यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी हाश्मी म्हणाले, “हे यश फक्त आम आदमी पार्टीचे नाही, तर आदिवासी समाजाच्या लढ्याचे आहे. रामटेकमधील घटनेने शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाचे दर्शन घडवले, पण ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाने न्याय मिळवून दिला.”
रामटेक शाळेतील वातावरण असुरक्षित असल्याची तक्रार मुलींनी पालकांकडे केली होती. त्यानंतर पालकांनी आपच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांची भेट घेऊन तातडीची कारवाई व शैक्षणिक नुकसान टाळण्याची मागणी केली होती. अमृत मेहर यांच्या नेतृत्वाखाली आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले होते. या प्रयत्नांनंतर शासनाने विशेष परवानगी देत मुलींच्या टीसी (ट्रान्सफर सर्टिफिकेट) निर्गमित करून गडचिरोलीत समायोजन केले.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार (दि. ०९ डिसेंबर २०२२) या विद्यार्थिनींचा मूळ प्रवेश रामटेक शाळेत झाला होता. मात्र पालकांच्या अर्जानुसार (दि. २१ ऑगस्ट २०२५) सुरक्षा आणि शैक्षणिक हित लक्षात घेऊन अखेरीस विशेष सूट मिळाली.
या घटनेनंतर आदिवासी समाजात दिलासा आणि आनंदाची लहर पसरली असून, आम आदमी पार्टीच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पक्षाने आता रामटेक शाळा व्यवस्थापनावर स्वतंत्र चौकशीची मागणी केली असून, दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.
आदिवासी मुलींच्या शिक्षण आणि सुरक्षिततेच्या लढ्यात ‘आप’चे हे पाऊल एक मीलाचा दगड ठरले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #TheGadVishva #AAP #Gadchiroli #TribalGirlsSafety #EducationRights #RamtekCase














