– चालकाच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला, प्रवासी सुखरूप
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ता. २९ : धानोऱ्यावरून गडचिरोलीकडे जाणाऱ्या महामंडळाच्या (क्र. एमएच 07 सी 9080) बसचा टायर आज पांढरसळा गावाजवळ अचानक फुटल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र चालकाच्या समयसूचकतेमुळे बस सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आल्याने मोठा अपघात टळला. या बसमध्ये जवळपास वीस प्रवासी होते, सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळाली.
घटनेनंतर प्रवाशांनी तक्रार केली की, बसमध्ये जॅक किंवा स्टेफनीसारखे आवश्यक टूल किटच उपलब्ध नव्हते. त्यामुळे बस रस्त्यावर उभी राहिल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. आधीच धानोरा–मुरूमगाव मार्गावर जुन्या व भंगार बसेस धाडल्या जात असल्याने प्रवाशांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागतो, अशी नाराजीही व्यक्त करण्यात आली.
प्रवाशांचे म्हणणे आहे की, “डेपोमधून बस सोडताना टूल किट व स्टेफनीची खात्री करून घ्यावी, मात्र तसे होत नसल्याने प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत.” या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून, प्रवाशांनी भविष्यातील सुरक्षिततेसाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.














