The गडविश्व
गडचिरोली, ३१ मार्च : आरमोरी तालुक्यातील मुल्लूर चक या छोट्याशा गावात मागील अनेक वर्षापासून दारूविक्रीबंदी असून ती टिकून आहे. या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सर्व गावकऱ्याच्या सहभागातून नुकताच गावाच्या प्रवेश द्वारावर विजयस्तंभ उभारण्यात आला.
मुल्लूर चक गावात एकूण १०२ एवढी लोकसंख्या आहे. या गावात दारूविक्री होत नाही. ग्रामस्थांच्या पुढाकारातून दारूविक्री बंदी गावात कायम आहे. दारूविक्रीबंदी यापुढेही कायम स्वरूपी टिकून राहावी, गावातील पुढील पिढी निर्व्यसनी निर्माण व्हावी, गावात होणारे सण, उत्सव आनंदाने साजरे करता यावे, गावात कोणत्याच प्रकारचा वाद होऊ नये, गुण्यागोविंदाने जगता यावे, तसेच आपल्या गावापासून इतर गावांना दारूबंदीची प्रेरणा मिळावी, शेजारी असलेल्या गावात सुद्धा दारूविक्री बंदी व्हावी. या विविध हेतूने गावाच्या सहभागातुन विजय स्तंभ उभारण्यात आला व गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महिला, युवक, वरिष्ठ मंडळी, व बालगोपाल इत्यादी मंडळी या कार्यक्रमाला हजर होती. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी मुक्तीपथ आरमोरी तालुका चमू विनोद कोहपरे, स्पार्क कार्यकर्त्या पल्लवी, सुषमा यांनी गावासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली.
यावेळी मुक्तीपथ अभियानाचे उपसंचालक संतोष सावळकर, गाव संघटना अध्यक्ष राजीराम हजारे, ऋषी भोयर, गीता बनकर, प्रणाली बनकर, गुडू बनकर, रेखा शिरूरकर, सुनील ठाकरे, विशाल हजारे, धृप इटनकर, सुरज हजारे, विठोबा इटनकर, दुर्वास हजारे यांच्यासह इतर गावकरी उपस्थित होते.