बांबू लागवडीच्या माध्यमातून ग्रामसभा ढवळीतील रोजगाराची नवी वळण

139

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : धानोरा तालुक्यातील ग्रामसभा ढवळी च्या पुढाकाराने सामुहिक वन हक्क क्षेत्रामध्ये १५ हेक्टर क्षेत्रावर बांबू रोपवाटिका कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे स्थानिक समुदायाला रोजगाराची संधी मिळणार असून, पर्यावरण संवर्धन देखील साधता येणार आहे.
सृष्टी संस्था आणि FES (Foundation for Ecological Security) यांच्या सहकार्याने ३ वर्षांपासून धानोरा तालुक्यातील १० ग्रामसभांसोबत काम सुरू आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन रोहयो विभागाचे शाखा अभियंता कुंभारे आणि श्याम गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. उद्घाटनाच्या वेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या उद्देशांबाबत आपले विचार मांडले.
सृष्टी संस्थेचे कुणाल गुरनुले यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की, ढवळी ग्रामसभेला २०१३ मध्ये २९६.३४ हेक्टर सामुहिक वन हक्क प्राप्त झाले. यानंतर २०२३ मध्ये वन व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे बांबू लागवडीच्या माध्यमातून स्थानिक ग्रामस्थांसाठी रोजगाराची निर्मिती करणे आणि पर्यावरणीय समृद्धी साधणे आहे. या उपक्रमामुळे २६,२३५ मनुष्यदिवस रोजगार निर्माण होईल, ज्यामुळे गावातील गरीब आणि बेरोजगार लोकांना रोजगार मिळण्यास मदत होईल.
उद्घाटन प्रसंगी श्याम गेडाम यांनी रोजगार हमी यंत्रणेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभांनी योग्य नियोजन केल्यास ग्रामस्थांना बारमाही रोजगार मिळू शकतो, असे सांगितले. यामुळे गावातील शेतमजुरांची आर्थिक प्रगती होईल.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या डंकलवार (RO) यांनी ग्रामसभा आणि वन विभाग यांच्या समन्वयातून चांगली कामे केली जाऊ शकतात आणि या क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी ग्रामसभा आणि यंत्रणेच्या पाठीशी राहतील, असे आश्वासन दिले.
सामूहिक वन हक्क क्षेत्रात बांबू लागवड हा महत्त्वाचा उपक्रम असून, याच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, जमिनीचे संवर्धन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. यामुळे स्थानिक बेरोजगारी कमी होईल तसेच वनसंवर्धनालाही गती मिळेल.
कार्यक्रमात ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आपला पाठिंबा दर्शविला. या उपक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती होती, त्यामध्ये आर. एच. ढवळे (रोहयो विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली), किरण गजलवार (APO), निशा (डाटा एन्ट्री ऑपरेटर), भानारकर (TPO धानोरा), डंकलवार (RO, दक्षिण धानोरा), श्रीमती. आर. बी. मडावी वनरक्षक, कुणाल गुरणूले (सृष्टी संस्था, येरंडी) विष्णूकांत गोविंदवाड प्रकल्प व्यवस्थापक FES, ललितदास साखरे जिल्हा समन्वयक FES गडचिरोली. परसराम कोवाची (ढवळी), विनोद कोवाची (अध्यक्ष, ग्रामसभा ढवळी), चंद्रशहा तुलावी (सचिव, ग्रामसभा ढवळी) मनोज चव्हाण (मास्टर ट्रेनर), धनंजय ठाकरे (तालुका समन्वयक), सायली मेश्राम (मास्टर ट्रेनर)आणि यांचा समावेश होता.
रोहयो विभागाचे अधिकारी, सृष्टी संस्था आणि FES चे कार्यकर्ते, तसेच ग्रामसभा पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांचा समावेश होता.
हा उपक्रम रोहयो विभाग आणि स्थानिक समुदायाच्या सहभागाने पर्यावरण आणि रोजगाराच्या क्षेत्रात एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here