स्त्रीसन्मानाची नवी वाट : संगीता ठलाल यांच्याकडून विधवा भगिणींचा आगळा सत्कार

42

स्त्रीसन्मानाची नवी वाट : संगीता ठलाल यांच्याकडून विधवा भगिणींचा आगळा सत्कार
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १९ : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सामाजिक सलोखा, समता व स्त्रीसन्मानाचा ठोस संदेश देणारा उपक्रम साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांच्या पुढाकारातून कुरखेडा येथे पार पडला. मूळ देऊळगाव येथील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असलेल्या संगीता ठलाल यांनी आपल्या स्वगृही विधवा महिला, मोलमजुरी करणाऱ्या महिला, आदिवासी महिला तसेच सुहासिनी महिलांसाठी सामूहिक स्नेहमिलन व सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.
या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया जुमनाके होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून कृषी सहाय्यक सपना कन्नाके तर प्रमुख पाहुणे म्हणून देऊळगाव येथील इंदू मेश्राम, वनिता मेश्राम, लता मिरी यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक नानाजी खुणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.
या वेळी संगीता ठलाल यांनी विधवा भगिणींचा पुष्पगुच्छ, शाल व वस्त्र देऊन सन्मान केला. तसेच उपस्थित मान्यवरांचा देखील पुष्पगुच्छ, शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख वक्त्या सपना कन्नाके यांनी महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करावी, कोणत्याही भीतीशिवाय पुढे जावे व अंधश्रद्धेपासून दूर राहावे, असे आवाहन केले. संगीता ठलाल या केवळ परखड लेखनातूनच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतूनही समाजकार्य करून दाखवत असल्याने समाजात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रिया जुमनाके यांनी महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, दैनंदिन योगाभ्यास करावा आणि कुटुंबीय जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करू नये, असे मार्गदर्शन केले. नानाजी खुणे यांनीही उपस्थितांना सामाजिक जाणीव जपण्याबाबत मोलाचे विचार मांडले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संगीता ठलाल यांनी उपस्थित सर्व महिलांना हळद-कुंकू व वाण देऊन स्नेहबंध अधिक दृढ केले. विशेषतः विधवा भगिणींसाठी झालेल्या या सन्मानामुळे त्या भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोणताही भेदभाव न करता सर्व महिलांना एकत्र आणून समाजाला सकारात्मक दिशा देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत संगीता ठलाल यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास यामिना मलगाम, गिरीजा मिरी, दिक्षिका चौधरी, मिरा वालदे, हिना मरसकोल्हे, वैशाली कुमरे, लता गहाणे, पूर्णा ठलाल यांच्यासह श्रीरामनगर व वृंदावन कॉलनी परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक संगीता ठलाल यांनी केले. सूत्रसंचालन रेखा मोहणे यांनी केले तर आभार विद्या पुस्तोडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here