कुरखेड्यात ‘योगी पॅटर्न’चा बुलडोझर धडकलाच : सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण जमीनदोस्त

83

– माजी नगराध्यक्ष संतप्त, दिला न्यायालयाचा इशारा
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २४ : कुरखेडा नगरपंचायतीने आज ‘योगी पॅटर्न’च्या धर्तीवर शहरातील अतिक्रमणांवर जोरदार धडक कारवाई करत सर्व्हिस रोड आणि बारा मीटर लेआउटवरील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला. भारतीय स्टेट बँक ते निना सर्व्हिस पेट्रोल पंपापर्यंतच्या पट्ट्यातील पक्की अतिक्रमणे हटवण्यात आली. ही कारवाई शहरात पहिल्यांदाच एवढ्या व्यापक स्वरूपात झाल्याने अतिक्रमणधारकांत घबराट निर्माण झाली आहे.
नागरिकांच्या तक्रारी आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे नगरपंचायतीने ही कठोर कारवाई हाती घेतली. मुख्याधिकारी पंकज गावंडे यांच्या नेतृत्वात मोठ्या बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली. याअंतर्गत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५३(१) अन्वये अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देण्यात आली होती. ३० दिवसांची मुदत संपल्यानंतर आज अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.विशेषतः माजी नगराध्यक्ष महेंद्रकुमार मोहबंशी यांचेही बांधकाम या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही कारवाई बेकायदेशीर आणि सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप केला. “ही फक्त अतिक्रमण हटवण्याची नाही, तर राजकीय सूडाची कारवाई आहे. आम्ही याचा न्यायालयात पाठपुरावा करू आणि शेवटपर्यंत लढा देऊ,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्या ठेलेधारकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या असून, उद्या त्या भागांतही कारवाई होण्याची शक्यता आहे. नगरपंचायतीने ‘अतिक्रमणमुक्त कुरखेडा’ या संकल्पनेतून ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करत नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews
#Kurkheda #EncroachmentDrive #BulldozerAction #YogiPattern #MunicipalCouncil #IllegalConstruction #UrbanCleanUp #MaharashtraNews #Gadchiroli #CourtBattle
#कुरखेडा #अतिक्रमणविरोधीकारवाई #बुलडोझरकारवाई #योगीपॅटर्न #नगरपंचायत #महेंद्रकुमारमोहबंशी #अनधिकृतबांधकाम #महाराष्ट्रवृत्त #गडचिरोली #न्यायालयीनलढा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here