गडचिरोलीत खनिज वाहतुकीसाठी ८५.७६ किमी चारपदरी महामार्गास मंजुरी
– सुरजागड मार्गाच्या विकासाला हिरवा कंदील; समृद्धी महामार्ग विस्तारालाही गती
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून जिल्ह्यातील खनिज वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान व सक्षम करण्यासाठी ८५.७६ किलोमीटर लांबीच्या चारपदरी सिमेंट काँक्रिट महामार्गास मंजुरी देण्यात आली आहे. नवेगाव–मोरे–कोनसरी–मूलचेरा–हेडरी–सुरजागड या मार्गाच्या चारपदरीकरणामुळे खनिज वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई येथे झालेल्या या बैठकीत समृद्धी महामार्गाच्या विस्ताराअंतर्गत भंडारा–गडचिरोली मार्गास गती देण्याचे निर्देश देण्यात आले. या विस्तारामुळे गडचिरोलीचा राज्यातील प्रमुख आर्थिक व औद्योगिक केंद्रांशी थेट संपर्क अधिक भक्कम होणार असून जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. कोणताही प्रकल्प विनाकारण रखडू नये, तसेच काम सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या आणि प्रशासकीय मंजुरी पूर्ण करूनच अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.
सुरजागडसह परिसरातील खनिज क्षेत्रांमधून होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने हा चारपदरी महामार्ग खनिज वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या निर्णयामुळे औद्योगिक गुंतवणूक वाढण्यास, रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यास तसेच जिल्ह्याच्या एकूण आर्थिक विकासास गती मिळेल, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #MineralCorridor
#FourLaneHighway #InfrastructureDevelopment
#Surjagad #MineralTransport #RoadDevelopment
#StateInfrastructure #MaharashtraDevelopment
#EconomicGrowth #IndustrialGrowth #ConnectivityBoost #SamruddhiMahamarg #CMDevendraFadnavis #CabinetDecision














