धान खरेदी केंद्रांअभावी शेतकरी अडचणीत; कुरखेड्यात काँग्रेसचा प्रशासनाला अल्टिमेटम
– २४ नोव्हेंबरपर्यंत केंद्रे सुरू न झाल्यास २५ नोव्हेंबरपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. २१ : खरीप हंगामातील धानाची कापणी आणि मळणी पूर्ण होऊनही तालुक्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर धान विक्रीचा प्रश्न निर्माण झाला असून आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर धान खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी कुरखेडा तालुका काँग्रेस समितीने प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत केंद्रे सुरू न झाल्यास बुधवार, २५ नोव्हेंबरपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे.
खरीप हंगाम २०२६-२७ मधील तालुक्यातील धान पिकाची कापणी व मळणीची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, शासकीय धान खरेदी प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा कायम असल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. धान विक्रीला विलंब होत असल्याने शेतीच्या पुढील हंगामासाठी लागणारा पैसा तसेच दैनंदिन आर्थिक गरजा भागविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.
यापूर्वी १२ नोव्हेंबर रोजी तालुका काँग्रेस समितीच्या वतीने संबंधित विभागाला निवेदन देऊन धान खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने काँग्रेसने आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रशासनाने २४ नोव्हेंबरपर्यंत तालुक्यातील सर्व शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करावीत. अन्यथा २५ नोव्हेंबरपासून तालुका काँग्रेस समिती आणि शेतकऱ्यांच्या सहभागातून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तालुका काँग्रेस अध्यक्ष जीवन पा. नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे, माजी पंचायत समिती सभापती गिरीधर तितराम, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रांजल धाबेकर, कपिल पेंदाम आणि दीपक सयाम यांनी प्रशासनाला हे निवेदन दिले आहे.
शेतकऱ्यांच्या धानाला योग्य हमीभाव मिळावा, त्यांची आर्थिक कोंडी होऊ नये आणि खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दराने धान विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने धान खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी काँग्रेस समितीने केली आहे.













