गडचिरोली : द्विभाषिक व संघटक पदांसाठी आदिवासी उमेदवारांना संधी
– गोंडी भाषेचे ज्ञान अनिवार्य; २७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : आदिवासीबहुल भागांमध्ये शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी द्विभाषिक व संघटक पदांवर सुशिक्षित अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची मानधन तत्त्वावर दहा महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, इच्छुकांनी २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांनी केले आहे.
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधारक असणे आवश्यक आहे. तसेच एमएससीआयटी प्रमाणपत्र, इंग्रजी टंकलेखनाचा ४० शब्द प्रतिमिनिट आणि मराठी टंकलेखनाचा ३० शब्द प्रतिमिनिट वेग असल्याचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. यासोबतच गोंडी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली येथे सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या मागील दोन वर्षांत कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार आहे. अर्जदारांकडे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
उमेदवार गडचिरोली प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, कोरची, चामोर्शी, धानोरा आणि वडसा या तालुक्यांतील रहिवासी असणे बंधनकारक आहे.
सर्व आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली कॉम्प्लेक्स एरिया, एलआयसी कार्यालयाजवळ, गडचिरोली येथे सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांनी केले आहे.













