नवजात बालकांच्या आरोग्यासाठी नियमित पुनर्तपासणी आवश्यक

3

नवजात बालकांच्या आरोग्यासाठी नियमित पुनर्तपासणी आवश्यक
– राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहात तज्ज्ञांचे मार्गदर्शन; विशेष काळजी आणि पाठपुरावा सेवेवर भर
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : नवजात बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी जन्मानंतरचे पहिले २८ दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. विशेषतः अकाली जन्मलेली, कमी वजनाची तसेच आजारी बालके यांची विशेष काळजी घेण्यासोबतच रुग्णालयातून घरी सोडल्यानंतरही नियमित वैद्यकीय पुनर्तपासणी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन तज्ज्ञांनी केले.
राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल रुग्णालयात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांच्या हस्ते झाले. यावेळी नवजात बालकांचे आरोग्य, पोषण, संगोपन आणि नियमित आरोग्य तपासणी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
१५ ते २१ नोव्हेंबरदरम्यान साजऱ्या होणाऱ्या या सप्ताहाची यंदाची संकल्पना _‘लहान बाळे, मोठी क्षमता; त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पाठपुरावा सेवेत गुंतवणूक करा’_ अशी आहे. मुलींच्या आरोग्य आणि पोषणाची काळजी किशोरवयापासूनच घेतली पाहिजे, असे डॉ. माधुरी किलनाके यांनी सांगितले. गर्भावस्थेतील आणि प्रसूतीनंतरचा सकस आहार, नवजात बालकांचे संगोपन, केवळ स्तनपानाचे महत्त्व तसेच माता आणि बालकाच्या आरोग्यरक्षणात कुटुंबाची भूमिका यावर त्यांनी प्रकाश टाकला.

पहिले २८ दिवस आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील

जन्मानंतरचे पहिले २८ दिवस बालकाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असतात. या काळात बालकांमधील धोक्याची लक्षणे वेळीच ओळखणे, आवश्यकतेनुसार उच्चस्तरीय उपचारांसाठी संदर्भ सेवा घेणे आणि रुग्णालयातून घरी पाठवल्यानंतर बालकाच्या प्रकृतीनुसार नियमित पुनर्तपासणी करणे गरजेचे आहे, असे वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय करपते यांनी सांगितले.
थंडीच्या दिवसांत नवजात आणि आजारी बालकांना उबदार ठेवणे, नियमित लसीकरण करणे तसेच जन्मजात दोष असलेल्या बालकांना जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रामार्फत (DEIC) उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ घेणे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्यविषयक माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे आणि माहितीपर साहित्याचा वापर करण्यात आला.
कार्यक्रमाला डॉ. नीलकंठ मसराम, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कन्नमवार, सहाय्यक अधिसेविका कविता पोतराजवार यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, परिचर्या प्रशिक्षणार्थी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. प्रतिज्ञा रामटेके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here