भेंडाळ्यात ‘स्मार्ट’अंतर्गत १.०४ कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण
– बियाणे स्वच्छता, प्रतवारी व पॅकेजिंगची अत्याधुनिक सुविधा; शेतकऱ्यांना मिळणार दर्जेदार बाजारपेठेची संधी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : शेतमालाचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांना अधिक चांगला बाजारभाव मिळावा, या उद्देशाने चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे शुभगॉन शेतकरी उत्पादक कंपनीच्या १ कोटी ४ लाख रुपये खर्चाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना बियाणे व कडधान्यांची स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकेजिंगची सुविधा उपलब्ध होणार असून, कृषी उत्पादनांच्या मूल्यवर्धनाला चालना मिळणार आहे.
मुलचेरा येथील शुभगॉन शेतकरी उत्पादक कंपनीने भेंडाळा येथे हा प्रकल्प उभारला आहे. यामध्ये यंत्रसामग्रीसाठी स्वतंत्र शेड, बियाणे स्वच्छता व प्रतवारी यंत्रणा तसेच पॅकेजिंगसाठी आवश्यक यंत्रसामग्रीचा समावेश आहे. कृषी विभागाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत आत्मा, गडचिरोलीच्या जिल्हा अंमलबजावणी कक्षामार्फत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.
प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी नागपूर विभागाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या विभागीय नोडल अधिकारी प्रज्ञा गोडघाटे, जिल्हा अंमलबजावणी कक्षाच्या प्रमुख तथा आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर आणि जिल्हा नोडल अधिकारी अर्चना कोचरे उपस्थित होत्या.
शेतमालाच्या मूल्यवर्धनातून उत्पन्नवाढीची संधी
कडधान्यांची स्वच्छता, योग्य प्रतवारी आणि आकर्षक पॅकेजिंग केल्यास शेतमालाची गुणवत्ता व बाजारातील मागणी वाढते. परिणामी शेतकऱ्यांना उत्पादनाचा अधिक चांगला दर मिळण्यास मदत होते, असे उपस्थित अधिकाऱ्यांनी नमूद केले. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल सामूहिकरीत्या संकलित करून त्यावर प्रक्रिया करावी आणि बाजारपेठेशी थेट जोडणी निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला विभागीय अंमलबजावणी कक्षाचे वित्तीय प्रवेश सल्लागार सत्यपाल ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी धर्मेंद्र गिरीपुंजे, चामोर्शीचे तालुका कृषी अधिकारी तुमडाम, मुलचेराचे तालुका कृषी अधिकारी पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, कंपनीचे संचालक, भागधारक, सभासद आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुलचेराचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आकाश लवटे यांनी प्रास्ताविक केले, तर जिल्हा अंमलबजावणी कक्षाचे वित्तीय प्रवेश सल्लागार कैलास शहारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.













