गडचिरोली : विमानतळाच्या भूसंपादनाला तूर्तास स्थगिती; उपोषण मागे घेण्याचे पालकर यांचे आवाहन

4

गडचिरोली : विमानतळाच्या भूसंपादनाला तूर्तास स्थगिती; उपोषण मागे घेण्याचे पालकर यांचे आवाहन
– मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राखी–गुरवळ्यात शेतकऱ्यांशी संवाद; चर्चेतून मार्ग काढण्याची ग्वाही
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : गडचिरोलीतील प्रस्तावित विमानतळासाठी सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने संपादित करून प्रकल्प राबविण्याचा शासनाचा कोणताही उद्देश नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले बेमुदत साखळी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार त्यांनी राखी–गुरवळा येथील उपोषणस्थळी भेट देत आंदोलक शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.
प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासंदर्भातील १२ मे २०२६ रोजीचा शासन निर्णय रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी गुरवळा–राखी–हिरापूर–शिरपूर शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने २ ऑक्टोबर २०२६ पासून राखी–गुरवळा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.
भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध झालेली असली, तरी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालय स्तरापर्यंतची पुढील भूसंपादन कार्यवाही थांबविण्यात आली आहे, अशी माहिती पालकर यांनी ग्रामस्थांना दिली. शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या मागण्यांचा विचार करून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. चर्चेतून अन्य पर्याय पुढे येऊ शकतात. मात्र, चर्चेतून समाधान न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा अधिकार अबाधित राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुपीक, बागायती जमीन गमावण्याची शेतकऱ्यांना भीती

राखी, गुरवळा, हिरापूर आणि शिरपूर परिसरातील शेती सुपीक असून बहुतांश जमीन बारमाही बागायती आहे. परिसरातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून, शेती हाच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार आहे. अशा परिस्थितीत विमानतळासाठी जमिनी संपादित झाल्यास उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे भूसंपादनाचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगत त्यांनी आपली भूमिका पालकर यांच्यासमोर मांडली.
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी तहसीलदार सागर कांबळे, पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी, आंदोलक शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here