
गडचिरोली : तीन ग्रामस्थांचा बळी घेणारी वाघीण अखेर जेरबंद, पहाटेच्या थरारक मोहिमेला यश
– भामरागड वनविभाग आणि ताडोबा बचाव पथकाची संयुक्त कारवाई; गोरेवाडा प्राणी उद्यानात हलविणार
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : एटापल्ली तालुक्यातील जंगल परिसरात दहशत निर्माण करून तीन ग्रामस्थांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे. शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) पहाटे ३ वाजताच्या सुमारास कसनसूर वनपरिक्षेत्रात राबविण्यात आलेल्या धाडसी मोहिमेत तीन वर्षीय ‘जी-२५ एसएएफ’ या वाघिणीला बेशुद्ध करण्यात आले. या कारवाईमुळे गेल्या काही महिन्यांपासून भीतीच्या छायेत वावरणाऱ्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भामरागड वनविभागांतर्गत कसनसूर (प्रादेशिक) वनपरिक्षेत्रातील जारावंडी राऊंडमधील वडसाकला बीट, कक्ष क्रमांक १ येथे ही मोहीम राबविण्यात आली. वनविभाग आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जलद बचाव पथकाने (आरआरटी) संयुक्तपणे नियोजनबद्ध कारवाई करत पहाटेच्या सुमारास वाघिणीला बेशुद्ध केले. त्यानंतर पुढील वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक कार्यवाहीसाठी तिला सुरक्षितपणे कसनसूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात हलविण्यात आले. पुढील प्रक्रियेनंतर या वाघिणीला नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात हलविण्यात येणार आहे.
चार महिन्यांत घेतले तीन ग्रामस्थांचे बळी
या वाघिणीच्या हल्ल्यांमुळे एटापल्ली तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मागील चार महिन्यांत तिने तीन जणांचा जीव घेतला होता. १६ ऑगस्ट रोजी दोलंदा येथील हरी बोहरण वड्डे (५७), १९ ऑक्टोबर रोजी इरपनपायली येथील विलाशी आनंद बा (७०) आणि २ नोव्हेंबर रोजी दिंडवी येथील सदाशिव झिटू दुग्गा (६०) यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले होते. या सलग घटनांमुळे वनविभागासमोर वाघिणीला पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.
आरआरटीची १२२ वी यशस्वी मोहीम
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथील जलद बचाव पथकाचे प्रमुख तथा वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. या पथकाची ही १२२ वी यशस्वी मोहीम ठरली. शूटर अजय मराठे यांच्यासह योगेश लकडे, दीपेश टेंभुर्णे, वसीम शेख, विकास ताजने, प्रफुल्ल वाटगुरे, अमोल कोरपे, अक्षय दांडेकर आणि गुरुनानक ढोरे यांनी मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.
वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर संयुक्त बचाव पथकाने पहाटेच्या सुमारास मोहीम फत्ते केल्याने संभाव्य वन्यजीव हल्ल्यांचे संकट तूर्तास टळले आहे. वारंवार होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यांमुळे चिंतेत असलेल्या कसनसूर परिसरातील ग्रामस्थांना या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #forest #tigeratyack #Gadchiroli #Bhamragad #Etapalli #KasanSur #TigerRescue #TigerCapture #WildlifeRescue #ForestDepartment #TadobaAndhariTigerReserve #MaharashtraForestDepartment #HumanWildlifeConflict #WildlifeConservation #GorewadaZoo #TheGadvishva













