एरंडीच्या बिया खाल्ल्याने आठ बालकांना विषबाधा; चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

3

एरंडीच्या बिया खाल्ल्याने आठ बालकांना विषबाधा; चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
The गडविश्व
नंदुरबार, दि. १२ : धडगाव तालुक्यातील दुर्गम मोडलगाव येथे शेताच्या बांधावर खेळताना एरंडीच्या बिया खाल्ल्याने एकाच कुटुंबातील आठ बालकांना विषबाधा झाली. या घटनेत चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला असून, एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य सहा बालकांवर धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बालकांचे आई-वडील रोजगारासाठी अन्य जिल्ह्यात मजुरीला गेले आहेत. त्यामुळे ही आठही भावंडे गावात आजी-आजोबांकडे राहत होती. घटनेच्या दिवशी आजोबा गुरे चारण्यासाठी गेले असताना मुले शेताच्या बांधावर खेळत होती. यावेळी त्यांनी तेथील एरंडीच्या झाडाच्या बिया खाल्ल्या. काही वेळातच बालकांना विषबाधेचा त्रास जाणवू लागला.
प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी सर्व बालकांना तातडीने धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान निर्मला बिज्या वळवी (वय ४) या बालिकेचा मृत्यू झाला. एका बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
विषबाधा झालेल्या बालकांमध्ये सुंदर कुवरसिंग वळवी (३), विवेक पिंट्या वळवी (४), जिंता सुभाष वळवी (३.५), विकी धनवरसिंग पाडवी (३), किरण सुभाष वळवी (२.५), मनोज बिज्या वळवी (५), पंकिता इसऱ्या पवार (४) आणि मृत बालिका निर्मला बिज्या वळवी (४) यांचा समावेश आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रोजगारासाठी आई-वडील बाहेरगावी गेल्यानंतर त्यांच्या लहान मुलांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here