गडचिरोली : मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते असरअल्ली येथे ७६ व्या वाचनालयाचे लोकार्पण

2

गडचिरोली : मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते असरअल्ली येथे ७६ व्या वाचनालयाचे लोकार्पण
– ‘एक गाव, एक वाचनालय’ उपक्रमातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मिळणार हक्काची अभ्यासिका
The गडविश्व
ता. प्र./सिरोंचा, दि. ०४ : दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्यासह स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘एक गाव, एक वाचनालय’ उपक्रमांतर्गत असरअल्ली येथे ७६ व्या सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते २ नोव्हेंबर रोजी ‘शहीद रवि चौधरी’ सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्याच्या आढावा दौऱ्यावर आलेल्या मुख्य सचिवांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची व भविष्यातील ध्येयांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करावे, शिक्षणाला प्राधान्य द्यावे आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणीही जाणून घेतल्या.

विशेष म्हणजे, गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफचे अधिकारी व अंमलदार आणि स्थानिक नागरिकांच्या श्रमदानातून व लोकवर्गणीतून या सुसज्ज वाचनालयाची उभारणी करण्यात आली आहे. येथे स्वतंत्र अभ्यासिका, टेबल, खुर्च्या, पुस्तके आणि पुस्तकांसाठी कपाटे अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या लोकार्पण सोहळ्याला परिसरातील ५०० हून अधिक नागरिक उपस्थित होते.

२०२३ पासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ७५ वाचनालयांची स्थापना करण्यात आली असून, त्यांचा लाभ ९ हजारांहून अधिक युवक-युवती व नागरिकांना होत आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाच्या माध्यमातून २०५ विद्यार्थी शासनाच्या विविध विभागांमध्ये नोकरी मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. दुर्गम भागातील तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice
#Gadchiroli #GadchiroliPolice #Asaralli #PublicLibrary #EkGaonEkVachanalaya #RajeshAgrawal #Education #CompetitiveExams #YouthEmpowerment #MaharashtraPolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here