गडचिरोलीत शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

2

गडचिरोलीत शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा
– शेतकरी कर्जमाफी, वनहक्क पट्टे आणि दुष्काळग्रस्त घोषणेची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मंगळवारी (३ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयापासून निघालेल्या या मोर्चात पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना तसेच शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वनहक्क कायद्यानुसार पात्र अतिक्रमणधारकांना वनहक्क पट्टे द्यावेत, संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, धानाला हमीभावाव्यतिरिक्त बोनस द्यावा, स्मार्ट मीटर काढण्याबाबत निर्णय घ्यावा, धानोरा-मुरुमगाव राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम पूर्ण करावे, शासकीय रुग्णालयांतील रिक्त पदे भरावीत तसेच शाळा व वसतिगृहांमधील सुविधा सुधाराव्यात, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मोर्चात सहसंपर्कप्रमुख श्रीकांत बंसोड, विधानसभा संघटक नंदू कुमरे, माजी जिल्हा संघटक विलास ठोंबरे, युवासेना जिल्हाप्रमुख गुणाजी बोरकुटे, शहरप्रमुख पप्पू शेख यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी, महिला आघाडीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवर शासन व प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here