चोप येथे दुर्गा उत्सव मंडळाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
– विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन
The गडविश्व
ता. प्र/ देसाईगंज, दि.०३ : सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ, चोप यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना बुक व पेन वितरित करण्यात आले.
यावेळी देसाईगंज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश ठाकरे, इंजि. हेमंत कोकुलवार, इंजि. अमोल रायपुरे, ग्रामपंचायत सचिव मेघना राऊत, शाळा समिती अध्यक्ष पोपट उईके, अरविंद कुथे, मुख्याध्यापक ठाकरे सर यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गटविकास अधिकारी निलेश ठाकरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. मंडळाच्या सामाजिक उपक्रमांची माहिती शुभम नागपूरकर यांनी प्रास्ताविकातून दिली.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेतील शैक्षणिक सुविधा, अडचणी आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेत भोजनाची गुणवत्ता व व्यवस्थेचीही पाहणी केली.
धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी मंडळाने पुढाकार घेतल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
मंडळाचे अध्यक्ष शेखर कुथे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वा बावणे, शिवम नागपूरकर, भाऊराव पालांदुरकर, तुषार उईके, समीर दाने, गोविंद बनपूरकर, तिलक गायकवाड व मंडळाच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews
#Gadchiroli #Desaiganj #Chop #Education #StudentSupport #SocialInitiative #EducationalMaterial #DurgaUtsavMandals













