मुख्याध्यापक आर. एम. अलगदेवे यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात; शैक्षणिक योगदानाचा गौरव

10

मुख्याध्यापक आर. एम. अलगदेवे यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात; शैक्षणिक योगदानाचा गौरव
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. ०३ : विकास विद्यालय तथा थोरवी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम. अलगदेवे यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहपूर्ण व भावपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवाकार्याचा गौरव करत शिक्षक, माजी विद्यार्थी आणि मान्यवरांनी आठवणींना उजाळा दिला.
अनेक वर्षांच्या शैक्षणिक सेवेत अलगदेवे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक म्हणून त्यांनी विद्यालयाच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी घडले असून त्यांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. यावेळी मान्यवरांनी अलगदेवे यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या सेवाभावाचे कौतुक केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी आर. एम. अलगदेवे यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी सेवाकाळातील अनुभव कथन केले. तसेच संस्था, सहकारी, विद्यार्थी आणि पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष पी. आर. आकरे होते. गटशिक्षणाधिकारी रामजी गुंजाळ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी एल. एम. गोपुलवाड आणि वडसा येथील प्राचार्य डॉ. नरेंद्र आरेकर उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सोनकुकरा सर यांनी केले, तर आभार प्रा. प्राजक्ता गायकवाड यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here