दिवाळीत MIDC भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत १३ गावांतील शेतकऱ्यांचा चक्काजाम
– शेती वाचविण्यासाठी शेतकरी रस्त्यावर; प्रस्तावित भूसंपादन रद्द करण्याची मागणी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : दिवाळीच्या सणातही आपल्या हक्काच्या जमिनी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील १३ गावांमध्ये प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी (MIDC) होणाऱ्या भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भूसंपादनाला विरोध दर्शवत आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रस्तावित MIDC साठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनामुळे १३ गावांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. पिढ्यान्पिढ्या कसत असलेली शेती हेच अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे जमीन संपादित झाल्यास उपजीविकेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. आपल्या जमिनी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, या बंदोबस्ताच्या माध्यमातून आंदोलनावर दबाव आणला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. चक्काजाममुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून, रुग्णवाहिकांनाही मार्ग मिळण्यात अडचणी येत असल्याचा मुद्दा समोर आला आहे.
भूसंपादन रद्द करण्याची मागणी
प्रस्तावित MIDC साठीचे भूसंपादन रद्द करून १३ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी सुरक्षित ठेवाव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
औद्योगिक विकासासाठी MIDC उभारण्याच्या प्रस्तावामुळे एकीकडे विकासाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आपल्या जमिनी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे. शासन या आंदोलनाची दखल घेऊन भूसंपादनाबाबत पुनर्विचार करणार की प्रस्तावित प्रक्रिया पुढे सुरू ठेवणार, याकडे आष्टी परिसरातील १३ गावांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.













