गडचिरोली : साई नर्सिंग संस्थेच्या कारभारावर गंभीर आक्षेप; डॉ. साळवेंच्या निलंबनाची मागणी

6

गडचिरोली : साई नर्सिंग संस्थेच्या कारभारावर गंभीर आक्षेप; डॉ. साळवेंच्या निलंबनाची मागणी
– अमिता मडावी यांची पत्रकार परिषदेतून चौकशीची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : वाकडी येथील साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड मेडिकल सायन्सच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संस्थेच्या मान्यता प्रक्रियेपासून रुग्णालयाच्या नोंदणीपर्यंतच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य अमिता शामकांत मडावी यांनी केली आहे. या प्रकरणातील चौकशी निष्पक्ष होण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित सुधाकर साळवे यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

मडावी यांच्या आरोपानुसार, डॉ. साळवे यांनी शासकीय पदावर कार्यरत असताना खासगी नर्सिंग संस्था स्थापन केली. संस्थेकडे आवश्यक रुग्णालयीन सुविधा, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग तसेच वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध नसतानाही १०० खाटांच्या रुग्णालयाचे नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यात आले. नर्सिंग विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी आवश्यक परवानग्या आणि मान्यतांबाबतही त्यांनी आक्षेप नोंदवले.

या प्रकरणी यापूर्वी शासनाकडे तक्रारी करण्यात आल्या असून, आरोग्य सेवा संचालनालयाने ३१ जुलै २०२६ रोजी डॉ. साळवे यांच्याविरुद्ध सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे मडावी यांनी सांगितले.

चौकशी प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप होऊ नये, यासाठी डॉ. साळवे यांना तातडीने निलंबित करून त्यांचे मुख्यालय गडचिरोली जिल्ह्याबाहेर ठेवावे, अशी त्यांची मागणी आहे. तसेच संस्थेची मान्यता, रुग्णालय नोंदणी आणि प्रत्यक्ष उपलब्ध सुविधांची पडताळणी करून अनियमितता आढळल्यास संबंधितांवर फौजदारी व विभागीय कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी न झाल्यास संबंधित कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा इशाराही अमिता मडावी यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here