जपतलई दुर्घटनेनंतर प्रशासनाचा दणका ; आश्रमशाळा बंद करण्याची शासनाकडे शिफारस

72

जपतलई दुर्घटनेनंतर प्रशासनाचा दणका ; आश्रमशाळा बंद करण्याची शासनाकडे शिफारस
– मुख्याध्यापकांसह दोन्ही वसतिगृह अधीक्षकांवर गुन्हा, तपासणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. संबंधित आश्रमशाळा बंद करण्याची शासनाकडे शिफारस करण्यात आली असून, मुख्याध्यापकांसह दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयाच्या सविस्तर अहवालाच्या आधारे संबंधित संस्थेच्या सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर आश्रमशाळा बंद करण्याची शिफारस शासनाकडे करण्यात आली.

मुख्याध्यापक, अधीक्षकांवर गुन्हा

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोलीचे सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) डॉ. प्रभू पुन्या सादमवार यांच्या फिर्यादीवरून धानोरा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ८६/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याध्यापक प्रशांत विलासराव ताटपल्लीवार, महिला वसतिगृह अधीक्षिका भाग्यश्री ज्ञानेश्वर चिंल्लमवार आणि वसतिगृह अधीक्षक भास्कर रामचंद्र भोयर यांच्यावर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा केल्याचा आरोप आहे.
पोलिस नोंदीनुसार, १० ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे २ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), ३(५) तसेच बाल न्याय अधिनियमातील कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासणी करणाऱ्यांचीही चौकशी

आश्रमशाळेच्या देखरेखीत त्रुटी राहिल्या का, याचीही प्रशासनाकडून पडताळणी सुरू आहे. मागील एक वर्षात शाळेची तपासणी करणाऱ्या सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या असून, त्यांच्या तपासणी अहवालांचा आढावा घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे.

राज्यातील आश्रमशाळांवर ‘सुरक्षा तपासणी’

जपतलई घटनेनंतर नागपूर अपर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व अनुदानित आश्रमशाळांची अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपासणी अधिक निष्पक्ष राहावी यासाठी एका प्रकल्प कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दुसऱ्या प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील आश्रमशाळांची तपासणी केली जाणार आहे.
या तपासणीत विद्यार्थ्यांची सुरक्षा, निवासी व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती तपासली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व अनुदानित आश्रमशाळांमध्ये कॉट व आवश्यक पायाभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

तृतीय-पक्ष ऑडिटचा प्रस्ताव

आश्रमशाळांमधील व्यवस्थेचे स्वतंत्र आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी तृतीय-पक्ष ऑडिटचा प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आला आहे. विद्यार्थी सुरक्षा, निवासी व्यवस्था, पायाभूत सुविधा आणि निर्धारित निकषांचे पालन यांचे स्वतंत्र मूल्यमापन या ऑडिटद्वारे केले जाणार आहे.
जपतलई घटनेनंतर प्रशासनाने केवळ संबंधित शाळेपुरती कारवाई न करता आश्रमशाळांच्या एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्रुटी अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #japtalai #school #snakebite #ashramShala # dhanora

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here