शेतीच्या रक्षणासाठी गडचिरोलीत शेतकऱ्यांची एकजूट; दर मंगळवारी दिंडी काढत ‘शेती बचाव’ आंदोलन

11

शेतीच्या रक्षणासाठी गडचिरोलीत शेतकऱ्यांची एकजूट; दर मंगळवारी दिंडी काढत ‘शेती बचाव’ आंदोलन
– जयरामपूर परिसरातील १३ गावांत दिंडी, एमआयडीसी भूमी अधिग्रहणाविरोधातील लढ्याला नवी धार
The गडविश्व
ता.प्र/ चामोर्शी, दि. २८ : प्रस्तावित एमआयडीसी भूमी अधिग्रहणाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यासाठी चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर परिसरातील शेतकऱ्यांनी नवा निर्धार केला आहे. आषाढी पर्वाच्या निमित्ताने परिसरातील १३ गावांमध्ये दिंडी काढून शेतकऱ्यांनी ‘शेती बचाव मंगळवार’ पाळण्याची घोषणा केली. यापुढे प्रत्येक मंगळवारी शेती वाचविण्यासाठी जनजागृती आणि आंदोलनात्मक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
पूर्वी धार्मिक परंपरेनुसार पाळल्या जाणाऱ्या ‘पोलो’ मंगळवाराच्या धर्तीवर आता प्रत्येक मंगळवार हा दिवस शेतीच्या संरक्षणासाठी समर्पित करण्यात येणार आहे. या दिवशी शेतकरी नियमित कामे बंद ठेवून शेती बचाव आंदोलनासाठी वेळ देणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.

जयरामपूर, मुधोली चक क्र. २, मुधोली तुकूम, गणपूर रै., विठ्ठलपूर, लक्ष्मणपूर, दुर्गापूर, चित्तरंजनपूर, सेल्लूर, किष्टापूर आणि अड्याळ या गावांमध्ये फलक, बॅनर व घोषणांसह भव्य दिंडी काढण्यात आली. दिंडीत शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

दिंडीदरम्यान “एमआयडीसी रद्द करा”, “कंपनी नको, शेती हवी”, “माझी शेती, माझं अस्तित्व”, “जमीन आमची, निर्णय आमचा”, “मातृभूमीचा सौदा मान्य नाही” आणि “शेतकरी एकजूट जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले की, शेती हा या भागातील हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार असून कोणत्याही परिस्थितीत सुपीक जमीन उद्योगासाठी देणार नाही. आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी दर मंगळवारी गावोगावी दिंडी, बैठका, जनजागृती आणि लोकप्रबोधनाचे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
एमआयडीसीसाठी प्रस्तावित भूमी अधिग्रहण तातडीने रद्द करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. आषाढी पर्वाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या शेतकरी एल्गारामुळे जयरामपूर परिसरातील भूमी अधिग्रहणविरोधी आंदोलनाला नवी ऊर्जा आणि व्यापक जनसमर्थन मिळाल्याचे चित्र दिसून आले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chamorshi #Gadchiroli #Chamorshi #Jairampur #FarmersProtest #SaveFarmland #SaveAgriculture #LandAcquisition #MIDC #FarmersUnity #Agriculture #Maharashtra #Farmland #Dindi #RuralIndia #FarmersMovement #LandRights #SaveLand #BreakingNews #MarathiNews #TheGadVishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here