‘वनवासी’ वक्तव्यावर आदिवासी समाज आक्रमक : कुरखेड्यात आज उलगुलान आंदोलन

3

‘वनवासी’ वक्तव्यावर आदिवासी समाज आक्रमक : कुरखेड्यात आज उलगुलान आंदोलन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०८ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासी समाजाचा उल्लेख ‘वनवासी’ असा केल्याच्या निषेधार्थ आज कूरखेडा येथे समस्त आदिवासी समाजाच्या वतीने भव्य उलगुलान व निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी अस्मितेच्या प्रश्नावर समाज एकवटला असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारण्यात येत आहे.
किसान सभागृह, कुरखेडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत आंदोलनाची माहिती देण्यात आली. ‘वनवासी’ हा शब्दप्रयोग आदिवासी समाजाच्या ओळखीला व अस्मितेला धक्का देणारा असून या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी, भविष्यात ‘वनवासी’ऐवजी संविधानमान्य ‘आदिवासी’ या शब्दाचा वापर करावा आणि आदिवासी समाजाच्या अस्मितेचा सन्मान राखावा, अशा प्रमुख मागण्या मोर्चाद्वारे मांडण्यात येणार आहेत.
कुरखेडा उपविभागीय कार्यालयावर धडकणाऱ्या या मोर्चात कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, कोरची आणि धानोरा तालुक्यांतील विविध आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी तसेच ४५ पोटजातींचे आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्यासह प्रभाकर तुलावी, गिरीधर तितराम, अमित कोराम, धरमदास उईके, अगरसिंग खडाधार, प्रभाकर जुमनाके, निलकंठ आलाम, आशाताई तुलावी, संध्याताई नैताम, चिरकुटा नैताम, संजय कोकोडे, गुलाब सोनकुसरे, गोविंद टेकाम, अरुण सोयाम, श्रीराम मडावी, घनश्याम तुलावी, गणेश काटेंगे, विजय तुलावी आदी उपस्थित होते.
आदिवासी अस्मिता, ओळख आणि संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी हे आंदोलन निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
#thegadvishva #thegdv #gadchirolinews #Kurkheda #UlgulanAndolan #AdivasiAsmita #TribalRights #Gadchiroli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here